चीनच्या ‘बीआरआय’ला आव्हान देण्यासाठी युरोपिय महासंघाकडून ‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’ला मान्यता

‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’ब्रुसेल्स/वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला आव्हान देण्यासाठी युरोपिय महासंघही पुढे सरसावला आहे. सोमवारी पार पडलेल्या महासंघाच्या बैठकीत ‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’ योजनेला मान्यता देण्यात आल्याची माहिती महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेफ बॉरेल यांनी दिली. युरोपची ही योजना चीनच्या ‘बीआरआय’ला बसलेला दुसरा मोठा धक्का मानला जातो. गेल्या महिन्यात ‘जी7’च्या बैठकीत सदस्य देशांनी ‘बी3डब्ल्यू’ कार्यक्रमाची घोषणा केली होती.

‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या दशकात ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’(बीआरआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. विविध देशांमध्ये पायाभूत सुविधांच्या माध्यमातून चीनचा प्रभाव वाढविणे हा या योजनेमागील मुख्य हेतू होता. गेल्या काही वर्षात चीनने या योजनेला आपल्या शिकारी अर्थनीतिचा भाग बनविले असून गरीब व अविकसित देशांमधील साधनसंपत्ती जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. चीनच्या या शिकारी अर्थनीतिविरोधात जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अमेरिका व युरोपसह जगातील आघाडीच्या देशांनी त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.

‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’दोन वर्षांपूर्वी जपानने ‘पार्टनरशिप फॉर क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर’ या कार्यक्रमातून चीनच्या ‘बीआरआय’ला आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडनेही पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या ‘आयलंड नेशन्स’साठी स्वतंत्र अर्थसहाय्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात ‘जी7’ गटाने ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’(बी3डब्ल्यू) कार्यक्रमाची घोषणा करून चीनला जबरदस्त धक्का दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पुढाकाराने मांडण्यात आलेल्या या योजनेत गरीब व मध्यम आर्थिक गटातील प्रकल्पांना अर्थसहाय्यासह इतर सहकार्य पुरविले जाईल.

‘जी7’ गटात जर्मनी, फ्रान्स व इटली या युरोपिय महासंघाच्या तीन आघाडीच्या सदस्य देशांचाही समावेश आहे. असे असतानाही महासंघाकडून चीनला रोखण्यासाठी स्वतंत्र योजनेला मान्यता देणे लक्ष वेधून घेत आहे. ‘चीन आर्थिक व व्यापारी मार्गाने जगभरात राजकीय प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याबद्दल केवळ चर्चा करण्यापेक्षा त्याला ठोस पर्याय देणे महत्त्वाचे आहे’, अशा शब्दात जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास यांनी महासंघाच्या नव्या योजनेचे समर्थन केले. युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र व विकास धोरणाला प्रोत्साहन देणे, सुरक्षाविषयक हितसंबंध जपणे व युरोपिय मूल्यांचा प्रसार हे मुद्दे ‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’च्या केंद्रस्थानी असतील, असे महासंघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

‘ग्लोबली कनेक्टेड युरोप’महासंघाकडून चीनच्या ‘बीआरआय’ला आव्हान दिले जात असतानाच अमेरिकेने युरोपबरोबर ‘युनायटेड फ्रंट’चे संकेत दिले. अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी महासंघाच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत चीनविरोधी संयुक्त आघाडीचा प्रस्ताव दिला. खुलेपणा, पारदर्शकता, निकोप स्पर्धा यासारख्या मूल्यांना असलेले धोके रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे येलेन यांनी स्पष्ट केले. येलेन यांच्या या वक्तव्यांवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, चीन या वक्तव्यांचा निषेध करतो असे चिनी प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

गेल्याच महिन्यात, व्यापार व तंत्रज्ञान क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी अमेरिका व युरोपिय महासंघाने ‘ईयू युएस ट्रेड अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर येलेन यांच्याकडून मांडण्यात आलेला प्रस्ताव चीनविरोधातील पाश्‍चात्य देशांची आघाडी अधिक भक्कम होत असल्याचे संकेत देत आहे.

leave a reply