युरोपिय महासंघाची बेलारुसविरोधात कठोर निर्बंधांना मंजुरी

- विमान उड्डाणांसह गुंतवणूक स्थगित करण्याचा निर्णय

ब्रुसेल्स/मिन्स्क – बेलारुसने विमान अपहरण करून रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला केलेल्या अटकेचे पाश्‍चात्य वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. युरोपिय महासंघाने तातडीची बैठक घेऊन बेलारुसविरोधात नवे निर्बंध जाहीर केले. हे निर्बंध म्हणजे प्राथमिक टप्पा असून बेलारुसने अधिक गंभीर परिणामांसाठी तयार रहावे, असा इशारा महासंघाने दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, बेलारुसची निर्भत्सना करून अमेरिकाही लवकरच या देशावर निर्बंध लादणार असल्याचे बजावले. तर बेलारुसचा शेजारी देश असलेल्या लाटवियाने बेलारुसच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली.

युरोपिय महासंघाची बेलारुसविरोधात कठोर निर्बंधांना मंजुरी - विमान उड्डाणांसह गुंतवणूक स्थगित करण्याचा निर्णयरविवारी सकाळी ग्रीसमधून लिथुआनियासाठी निघालेले ‘रायनएअर’ कंपनीचे विमान मध्येच हायजॅक करून जबरदस्तीने बेलारुसच्या मिन्स्क विमानतळावर उतरविण्यात आले होते. विमानात बॉम्ब असल्याचा खोटा अ‍ॅलर्ट देऊन तसेच लढाऊ विमान पाठवून विमान उतरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. हमास या दहशतवादी संघटनेने या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याचा दावा बेलारुसने केला होता. मात्र हमासने हा दावा फेटाळून लावला आहे.

विमानातून प्रवास करणार्‍या रोमन प्रोटासेविक या पत्रकारांना तसेच त्यांची सहकारी सोफिआ सॅपेगाला हिला बेलारुसच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले. रोमन प्रोटासेविक यांना थेट तुरुंगात धाडून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आला. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून बेलारुसमध्ये राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर पोहोचविणे व निदर्शने आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्यात रोमन प्रोटासेविक आघाडीवर होते.

युरोपिय महासंघाची बेलारुसविरोधात कठोर निर्बंधांना मंजुरी - विमान उड्डाणांसह गुंतवणूक स्थगित करण्याचा निर्णय2019 साली बेलारुस सोडून बाहेर पडलेल्या प्रोटेसेविक यांनी लिथुआनियातून काम करण्यास सुरुवात केली होती. शनिवारी ग्रीसमधील एक कार्यक्रम आटपून रविवारी लिथुआनियात माघारी परतत असतानाच प्रोटेसेविक यांना लुकाशेन्को सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे उघड झाले आहे. विरोध करणार्‍या पत्रकाराला ताब्यात घेण्यासाठी विमानाचे अशा रितीने अपहरण करण्याच्या या घटनेवर युरोपातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

युरोपिय महासंघ तसेच अमेरिकेने सदर घटना अपहरणाचीच प्रतिक्रिया देऊन याच्या चौकशीची मागणी केली. युरोपिय महासंघाने या मुद्यावर सोमवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत बेलारुसवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार, बेलारुसच्या विमान कंपन्यांवर ‘फ्लाईट बॅन’ लादण्यात आला असून या देशाला आता युरोपची हवाईहद्द वापरता येणार नाही. त्याचवेळी युरोपिय प्रवासी विमान कंपन्यांनीही बेलारुसची हवाईहद्द वापरु नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच युरोपिय महासंघाकडून बेलारुसला देण्यात येणारे तीन अब्ज युरोचे ‘इन्व्हेस्टमेंट पॅकेज’ स्थगित करण्यात आले आहे.

युरोपिय महासंघाची बेलारुसविरोधात कठोर निर्बंधांना मंजुरी - विमान उड्डाणांसह गुंतवणूक स्थगित करण्याचा निर्णय‘फ्लाईट बॅन’ व गुंतवणूक रोखण्याबरोबरच अधिक कठोर आर्थिक निर्बंध लादण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे महासंघाकडून सांगितले जात आहे. युरोपिय महासंघाबरोबरच ब्रिटननेही ‘फ्लाईट बॅन’ची घोषणा केली असून अधिक निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने युरोपिय महासंघ व ब्रिटनकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांना समर्थन दिले. बायडेन प्रशासनही बेलारूसवर नव्या निर्बंधांची घोषणा करील, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. नाटो तसेच संयुक्त राष्ट्रसंघटनेने पत्रकार रोमन प्रोटासेविक यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी बेलारुसच्या सरकारकडे केली आहे.

दरम्यान, बेलारुसचा शेजारी देश असणार्‍या लाटवियाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान बेलारुसचा राष्ट्रध्वज खाली उतरविला. बेलारुसमध्ये झालेल्या विमान अपहरण व पत्रकाराच्या अटकेच्या निषेधासाठी हा ध्वज उतरविण्यात आल्याची प्रतिक्रिया लाटवियाने दिली. यामुळे दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला असून, दोन्ही देशांनी परस्परांच्या राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे.

leave a reply