अफगाणिस्तानातील घडामोडींचे फार मोठे पडसाद उमटतील

- भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा इशारा

नवी दिल्ली – गेल्या वर्षी तालिबानबरोबर करार करताना, अमेरिकेने भारताला विश्‍वासात घेतले नव्हते, याची आठवण करून देऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील घडामोडींचे फार मोठे पडसाद उमटणार असल्याचे बजावले आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेने कतारची राजधानी दोहा येथे तालिबानबरोबर वाटाघाटी करून अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा करार केला होता. यावेळी तालिबानने रक्तपात न करण्याचे तसेच दहशतवादाला थारा न देण्याचे मान्य केले होते. पण सध्या अफगाणिस्तानात वेगळेच चित्र दिसत आहे, याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला करून दिली.

अफगाणिस्तानातील घडामोडींचे फार मोठे पडसाद उमटतील - भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा इशारा‘युएस-इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनरशिप फोरम-युएसआयएसपीएफ’ने आयोजित केलेल्या चर्चेत व्हर्च्युअल माध्यमातून परराष्ट्रमंत्री जयशंकर सहभागी झाले होते. यावेळी अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत फ्रँक विझ्नर यांच्याशी संवाद साधताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे व याला अमेरिकेची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचे राजनैतिक भाषेत स्पष्ट केले. गेल्या वर्षी दोहा येथे अमेरिकेची तालिबानबरोबर चर्चा पार पडली. या चर्चेनंतर करार संपन्न झाला होता व यावेळी अमेरिकेने अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारीची घोषणा केली.

या कराराच्या आधी झालेल्या वाटाघाटीत अमेरिकेने पाकिस्तानला फार मोठी भूमिका पार पाडण्याची संधी दिली होती. तर अफगाणिस्तान व तालिबानबाबत निश्‍चित भूमिका असलेल्या भारताला या चर्चेपासून दूर ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय अमेरिकेने घेतला होता. त्यावेळीही भारताने पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशावर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, याचे दूरगामी परिणाम होतील, असे अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांना बजावले होते. काही महिन्यातच भारताचा इशारा प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, दिलेली सारी आश्‍वासने पायदळी तुडवून तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली. इतकेच नाही तर सर्वसामावेशक सरकार आणि दहशतवादाला थारा न देण्याचे ग्वाही देणार्‍या तालिबानची पावले वेगळ्याच दिशेने पडू लागल्याचे समोर येत आहे.

युएसआयएसपीएफच्या चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या सार्‍या गोष्टींची आठवण करून दिली. सीमेपलिकडील दहशतवादाचा अनुभव भारत व अफगाणिस्तानने घेतलेला आहे. त्यामुळे या समस्येकडे भारत अधिक सजगतेने पाहत आल्याचे सांगून जयशंकर यांनी अमेरिकेने पाकिस्तानबाबत ही सावधानता दाखविली नाही, हे लक्षात आणून दिले. याचा परिणाम म्हणून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या घडामोडींचा दाखला देऊन याचे फार मोठे पडसाद या क्षेत्रात उमटणार असल्याचेही जयशंकर यांनी बजावले. सध्या अमेरिकेचे नेते, लष्करी अधिकारी देखील ही बाब मान्य करू लागले असून सैन्यमाघारीच्या निर्णयाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्याची शर्यत अमेरिकेत सुरू झाली आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यापासून ते संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांचाही समावेश आहे.

दरम्यान, युएसआयएसपीएफच्या या कार्यक्रमात बोलताना अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारत व अमेरिकेचे बर्‍याच अंशी एकमत असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले. अफगाणिस्तानात सर्वसामावेशक सरकार व दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर न होऊ देण्यावर भारत-अमेरिकेची सहमती आहे. तर काही मुद्यांवरील सहमती अधिक किंवा कमी प्रमाणात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. मात्र अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेताना, अमेरिकेने केलेले दावे निकालात निघाले आहेत आणि तालिबान तसेच तालिबानच्या मागे असलेल्या पाकिस्तानने अमेरिकेचा विश्‍वासघात केल्याची बाब भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कूटनीतिच्या भाषेत मांडली. त्याचवेळी भारतासारख्या जबाबदार व विश्‍वासार्ह देशाच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष केल्याचे दुष्परिणाम अफगाणिस्तानात समोर येत असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या चर्चेत लक्षात आणून दिले.

leave a reply