ब्राझिलमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक

ब्रसिलिया,  (वृत्तसंस्था) – जगभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसचे बळी व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोनामुळे जगभरात एका दिवसात पाच हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून तब्बल एक लाख आठ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये या साथीचा विस्फोट झाला असून या देशातील परिस्थिती भयावह बनल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना देत आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत ब्राझिलने रशियालाही मागे टाकले आहे. कोरोनाची साथ आल्यानंतर लॉकडाउन करण्यास नकार देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या चुकिच्या धोरणांमुळेच ब्राझिलवर ही वेळ ओढावल्याचे दिसत आहे.

लॅटिन अमेरिका या साथीचे नवे केंद्र ठरत असल्याची चिंता काही तासांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली होती. लॅटिन अमेरिकेतील  ब्राझील आणि चिली या देशांमधील कोरोनाच्या बळींची संख्या या चिंतेमागील प्रमुख कारण होते.  गेल्या चोवीस तासात जगभरात या साथीचे ५,२२४ अधिक बळी गेले आहेत. यापैकी अमेरिकेत १,२८६ तर ब्राझीलमध्ये १,१८८ आणि युरोपमध्ये १,६१४ जण या साथीने दगावले आहेत. ब्राझिलमध्ये दरदिवशी या साथीने दगावणाऱ्यांची संख्या अमेरिकेजवळ पोहोचत असून यासाठी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. 

कोरोनाची सातथ आल्यानंतर ब्राझिलमध्ये लॉकडाउन लागू करा, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्याकडे केली जात होती. मात्र, ही मागणी धुडकावून बोल्सोनारो यांनी बाजारपेठेत खरेदी करीत असतानाचे स्वत:चे फोटो प्रसिद्ध केले आणि जनतेने कोरोनाला घाबरु नये, असा संदेश दिला होता. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे ब्राझिलच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जोरदार टीका केली होती. पण त्याची पर्वा न करता बोल्सोनारो यांनी लॉकडाउन न करण्याचा निर्णय कायम ठेवला होता. त्याचे परिणाम आता समोर येत असून यामुळे बोल्सोनरो यांच्यावरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

सलग तीन दिवस जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत एक लाखाने वाढ झाल्यामुळे  या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ५३,४७,५५२ वर पोहोचली आहे. बरोबर तीन दिवसांपूर्वी, बुधवारी जगभरातल्या साथीच्या रुग्णांची संख्या पन्नास लाखांच्या पुढे गेली होती. त्यानंतर कोरोनाच्या जगभरातील रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक बाब ठरते. त्याचवेळी या साथीचे जवळपास २२ लाख रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, वर्ल्डओमीटर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात या साथीचे अमेरिकेत २४,१७०, ब्राझीलमध्ये २०,८०३ तर युरोपात १९,५४४ नवे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या साथीच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात या साथीची दुसरी लाट रशियात धडकू शकते आणि यामुळे रशियाला मोठा फटका बसू शकतो, असे राष्ट्रपती पुतिन यांनी बजावले. तसेच या साथीच्या दुसऱ्या लाटेसाठी रशियन यंत्रणांनी तयार राहावे, अशी सूचनाही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. लॉकडाउनचे नियम हळुहळू काढण्याबरोबरच रशियन अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत लवकरात लवकर आपल्यासमोर अहवाल सादर करा, असे आदेश पुतिन यांनी दिले आहेत.  रशियात या साथीने ३,४०० दगावलले असून या साथीचे साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण आहेत.

leave a reply