भारतातून रसायनांची निर्यात वाढली

नवी दिल्ली – रबर, रंग, प्लास्टिक, वस्त्र व चामडे आणि औषध उत्पादन क्षेत्रासाठी केमिकल्सची आयात करणारा भारत गेल्या आर्थिक वर्षामध्ये प्रथमच केेेमिकल आणि संबंधित उत्पादनांचा निव्वळ निर्ययातदार बनला आहे. केंंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

India-Exportऔषध फॉर्म्युलेशन, बल्क ड्रग्स आणि ड्रग इंटरमिडीएट्स, सेंद्रिय रसायने, ॲग्रो केमिकल्स आणि खतांच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षात ३ टक्के वाढ झाली असून ही निर्यात ४५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. तर औषधांशी निगडीत असलेल्या रासायनिक मालाची आयात ७.३ टक्क्यांनी घटून प्रथमच ४४.३ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरली आहे. दहा वर्षात प्रथमच देशातून या क्षेत्रात आयातीपेक्षा निर्यात अधिक झाली आहे.

देशातील केमिकल आणि त्यासंबंधातली उत्पादनांचा १५ विस्तृत श्रेणींमध्ये समावेश केला जातो. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात या क्षेत्रात योग्य धोरण आखले तर या क्षेत्रातली निर्यात वाढवली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या दशकभरात केमिकल्स आणि त्यासंबंधात उत्पादनांची निर्यात दुप्पटीने वाढली आहे. २०११ सालात या क्षेत्रात २०.८ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. ती गेल्या आर्थिक वर्षात ४५ अब्ज डॉलर्सवर गेली. कोरोनाव्हायरसच्या संकटाशी सामना करीत असताना देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी रसायन निर्मिती क्षेत्रातून ही उत्साह वाढविणारी बातमी आली आहे.

leave a reply