अफगाणिस्तानातील वेगवान घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर

- भारताचे परराष्ट्रमंत्री रशियाच्या भेटीवर जाणार

नवी दिल्ली- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लवकरच रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. भारत व रशियामधील वार्षिक द्विपक्षीय चर्चेची तयारी हे परराष्ट्रमंत्र्यांच्या रशिया भेटीमागचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते. मात्र अफगाणिस्तानातील घडामोडींना कमालीचा वेग आलेला असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा रशिया दौरा लक्षवेधी ठरतो. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानातील परिस्थितीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर रशियाबरोबर चर्चा करतील, अशी दाट शक्यता वर्तविली जाते.

अफगाणिस्तानातील वेगवान घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर - भारताचे परराष्ट्रमंत्री रशियाच्या भेटीवर जाणारतालिबानने अफगाणी लष्कराच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली असून लवकरच तालिबान अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करील, अशी शक्यता वर्तविली जाते. याची दखल जगभरातील प्रमुख देशांनी घेतली असून रशिया अफगाणिस्तानातील या घडामोडींकडे अत्यंत सावधपणे पाहत आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीची जाहीर चर्चा होण्याच्या कितीतरी आधी रशियाने अफगाणिस्तानातील आपल्या हितसंबंधांसाठी पाकिस्तानशी सहकार्य सुरू केले होते. हे सहकार्य पुढच्या काळात अधिकाधिक वाढत जाईल आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन पाकिस्तानचा दौरा करतील, असा दावा पाकिस्तानची माध्यमे करीत होती. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन पाकिस्तानला भेट देणार नसल्याचा खुलासा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या पाकिस्तान भेटीची शक्यता निकालात निघालेली असली, तरी अफगाणिस्तानच्या मुद्यावर रशिया पाकिस्तानशी सहकार्य करीत आहे, ही बाब भारताचे लक्ष वेधून घेत आहे. काही विश्‍लेषक तर अफगाणिस्तानातील भारत व रशियाचे हितसंबंध परस्परविरोधी असल्याचे सांगून अफगाणिस्तानच्या भूमीवर भारत व रशियाच्या हितसंबंधांची टक्कर होईल, असे दावे करीत आहेत. मात्र अफगाणिस्तानच्या भूमीचा आपल्या विरोधात वापर होऊ नये, ही भारत व रशियाची प्रमुख चिंता आहे. याबाबत तालिबान कोणती भूमिका स्वीकारते, यावर बरेच काही अवलंबून असेल.

या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या रशियाभेटीत अफगाणिस्तानातील घडामोडींचा मुद्दा केंद्रस्थानी असू शकतो. परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत बोलताना सूत्रांनी वृत्तसंस्थांना ही माहिती दिली. अफगाणिस्तानातील तालिबानची आगेकूच आणि हिंसाचार ही भारतासाठी फार मोठ्या चिंतेची बाब ठरते. एकेकाळी सोव्हिएत रशियाच्या विरोधात लढणार्‍या तालिबानकडे आत्ताचा रशिया देखील सावधपणे पाहत आहे. पुढच्या काळात तालिबान रशियाच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र तालिबान आपण रशियाच्या तसेच भारताच्याही विरोधात नसल्याचे संकेत देत आहे.

तालिबानचा कट्टर विरोधी गट मानल्या जाणार्‍या नॉर्दन अलायन्सवर रशियाचा फार मोठा प्रभाव आहे. अफगाणिस्तानचे लष्कर तालिबानसमोर कोसळल्यानंतर या नॉर्दन अलायन्सकडेच तालिबानचा सामना करण्याची क्षमता असेल, असे सामरिक विश्‍लेषक सांगत आहेत. मात्र तालिबानने सामोपचाराची भूमिका स्वीकारली तर हा संघर्ष टळू शकेल व रशिया त्यासाठीच हालचाली करीत असल्याचे उघड होत आहे. याबरोबरच रशियाकडून पाकिस्तान व चीन या देशांचे सहकार्य घेऊन अफगाणिस्तान स्थीर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही दावे काहीजणांकडून केले जात आहे. मात्र पाकिस्तान आणि चीनचा अफगाणिस्तानवरील प्रभाव वाढला, तर ती भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारी बाब ठरू शकेल. यामुळे अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारताची रशियाबरोबरील चर्चा व सहकार्य अतिशय महत्त्वाची बाब ठरत आहे.

leave a reply