9/11 व ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्यांचे आव्हान एकसारखे – ‘एफबीआय’च्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेला 9/11चा दहशतवादी हल्ला व आता अमेरिकेवर होणारे सायबरहल्ले यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी निर्माण झालेली आव्हाने जवळपास सारखीच आहेत, असा दावा ‘एफबीआय’च्या (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) प्रमुखांनी केला. दोन्ही हल्ल्यांमुळे सामान्य अमेरिकी जनतेला मोठ्या उलथापालथींना सामोेरे जाण्याची वेळ ओढावली, याकडे ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी लक्ष वेधले. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी भविष्यात होणारा सायबरहल्ला 9/11 इतकाच भयंकर असेल, असा इशारा दिला होता.

9/11अमेरिकेत गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ एक मोठे सायबरहल्ले होत आहेत. यात मायक्रोसॉफ्ट, सोलरविंड्स, फायरआयसारख्या आघाडीच्या कंपन्यांपासून महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात अमेरिकेत ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचेही समोर आले आहे. मे महिन्यात अमेरिकेतील सर्वात मोठी इंधनवाहिनी कंपनी ‘कोलोनिअल पाईपलाईन’ला सायबरहल्ल्याचे लक्ष्य बनविण्यात आले होते.

या हल्ल्यात सदर कंपनीकडून ‘डार्कसाईड’ या गटाने सुमारे 50 लाख डॉलर्सची खंडणी उकळली होती. त्यानंतर अमेरिकेतील ‘मीट प्रॉडक्शन’ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असणार्‍या ‘जेबीएस’ या कंपनीवरही सायबरहल्ला करण्यात आला. त्यापाठोपाठ अमेरिकेतील एक ‘फेरी सर्व्हिस’ तसेच दोन ‘टीव्ही न्यूज स्टेशन्स’वरही सायबरहल्ले करण्यात आले. हे हल्लेदेखील ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील असल्याचे सांगण्यात येेते. या पार्श्‍वभूमीवर ‘एफबीआयए’च्या प्रमुखांनी सदर हल्ल्यांची 9/11च्या हल्ल्याशी केलेली तुलना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

9/11कोलोनिअल तसेच ‘जेबीएस’सारख्या कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यांचा फटका सामान्य अमेरिकी जनतेला बसल्याचे ‘एफबीआय’चे संचालक रे यांनी सांगितले. त्यामुळे सायबरहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकी नागरिकांमध्ये अधिक सजगता आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एफबीआय सध्या जवळपास 100 ‘रॅन्समवअर्स’चा तपास करीत असून याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात असल्याचे रे यांनी सांगितले. यावेळी अमेरिकेत होणार्‍या या सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा आरोपही ‘एफबीआय’च्या संचलाकांनी केला.

दरम्यान, गुरुवारी ‘कॉक्स मीिडिया’ कंपनीच्या दोन ‘टीव्ही न्यूज चॅनल्स’वर सायबरहल्ला झाल्याचे उघड झाले आहे. ‘डब्ल्यूएफटीव्ही’ व ‘डब्ल्यूपीएक्सआय’ अशी या चॅनल्सची नावे आहेत. या दोन्ही चॅनल्सचे प्रसारण गुरुवारी तसेच शुक्रवारी बंद राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

leave a reply