एफबीआय, युरोपोल व ऑस्ट्रेलियन यंत्रणेच्या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

- 800 गुन्हेगारांना अटक, 32 टन अमली पदार्थ व मोठा शस्त्रसाठा जप्त

वॉशिंग्टन/हेग/कॅनबेरा – अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’(फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), युरोपोल आणि ऑस्ट्रेलियन सुरक्षायंत्रणांनी राबविलेल्या एका आंतरराष्ट्रीय मोहिमेत तब्बल 800 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपसह 16 देशांमध्ये टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये अमली पदार्थांसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, रोकड तसेच लक्झरी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या ‘स्टिंग ऑपरेशन’साठी ‘अ‍ॅनोम’ या मेसेजिंग अ‍ॅपचा समावेश असलेल्या ‘एन्क्रिप्टेड स्मार्टफोन्स’चा वापर करण्यात आल्याची माहिती ‘एफबीआय’ने दिली आहे. गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

एफबीआय, युरोपोल व ऑस्ट्रेलियन यंत्रणेच्या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त - 800 गुन्हेगारांना अटक, 32 टन अमली पदार्थ व मोठा शस्त्रसाठा जप्तअमेरिकन तपास यंत्रणा ‘एफबीआय’ने 2018 साली केलेल्या एका कारवाईनंतर ‘एन्क्रिप्टेड स्मार्टफोन्स’चा वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांसाठी काम करणार्‍या एका तंत्रज्ञाचा वापर करून मेसेजिंग अ‍ॅप व ‘एन्क्रिप्टेड स्मार्टफोन्स’ तयार करण्यात आले. हे स्मार्टफोन्स अत्यंत कौशल्याने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये विकण्यात आले. या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून पाठविण्यात येणार्‍या संदेशांवर नजर ठेऊन ते ‘डिकोड’ करून ‘ऑपरेशन ट्रोजन शिल्ड’ ही आंतरराष्ट्रीय मोहिम राबविण्यात आल्याचे अमेरिकी तपासयंत्रणेने स्पष्ट केले.

एफबीआय, युरोपोल व ऑस्ट्रेलियन यंत्रणेच्या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त - 800 गुन्हेगारांना अटक, 32 टन अमली पदार्थ व मोठा शस्त्रसाठा जप्त‘ऑपरेशन ट्रोजन शिल्ड’ अंतर्गत 16 देशांमधून 800 संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान, 32 टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यात आठ टन कोकेन, 22 टन हशिश व दोन टन ‘मेथ’चा समावेश आहे. याव्यतिरिक्त 4.8 कोटी डॉलर्स मूल्याची रोख रक्कम तसेच क्रिप्टोकरन्सीही ताब्यात घेण्यात आली. 250 हून अधिक शस्त्रास्त्रे व 55 लक्झरी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेत ‘एफबीआय’, ‘युरोपोल’ व ऑस्ट्रेलयन फेडरल पोलिसदलाच्या नऊ हजार अधिकार्‍यांनी सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई ऑस्ट्रेलियात पार पडली असून 200 हून अधिक संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑस्ट्रेलियात सुमारे 3.7 टन अमली पदार्थ व 104 शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘ऑपरेशन ट्रोजन शिल्ड’मुळे संघटित गुन्हेगारी विश्‍वाची संपर्क यंत्रणा व त्यावर आधारलेले व्यवहार यांना धक्का बसला असून तंत्रज्ञानाचा वापर करून तपासयंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल, असा दावा ‘एफबीआय’कडून करण्यात आला आहे.

leave a reply