कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने सोन्याच्या दरांमध्ये वाढ

लंडन/न्यूयॉर्क – कोरोना साथ नियंत्रणात आणल्याचा दावा करणाऱ्या चीन व दक्षिण कोरियात पुन्हा नवे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमुळे कोरोना साथीची ‘सेकंड व्हेव’ अर्थात दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली असून त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेत उमटले आहेत. गुरुवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली असून ते १७२५ डॉलर्स प्रति औसांवर गेले आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेतील एका बँकेने २०२१ सालच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर प्रति औंस तीन हजार डॉलर्सपर्यंत जाण्याचे भाकित वर्तविले होते.

कोरोना साथीचे मूळ असणाऱ्या चीनने साथीवर विजय मिळविल्याचा दावा केला होता. चीनचा शेजारी देश असणाऱ्या दक्षिण कोरियानेही साथ नियंत्रणात आणल्याचे जाहीर केले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. या घटनेनंतर कोरोनाव्हायरसची साथ पुन्हा उचल खाईल, असे संकेत मिळत आहेत.

या भीतीचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी जगातील विविध शेअरबाजारांमध्ये घसरणीस सुरुवात झाली. त्याचवेळी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली असून प्रति औंस १७२५ डॉलर्सने व्यवहार नोंदविण्यात आले. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतरची ही सर्वोच्च पातळी मानली जाते.

गेल्या वर्षात सोन्याच्या दरांनी ३० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली होती. त्यानंतर विविध विश्लेषक व कंपन्यांनी सोन्याचे दर या वर्षाच्या अखेरीस दोन हजार डॉलर्सवर जातील, असा इशारा दिला होता. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था व भीतीच्या वातावरणामुळे, गुंतवणूकदारांचा सोन्याकडे असलेला कल कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.

‘बँक ऑफ अमेरिका’ने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, २०२१ सालच्या अखेरपर्यंत सोन्याच्या दरांमधील वाढ कायम राहण्याचे भाकित वर्तविले आहे. कोरोना साथीमुळे विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून मोठया प्रमाणात अर्थसहाय्य जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदरांमध्ये प्रचंड घट होईल व त्याचा परिणाम सोन्यातील गुंतवणूक वाढण्यावर होईल, असे अहवालात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांची सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याचेही समोर आले आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याचा परकीय गंगाजळीतील हिस्सा १९.५ टक्क्यांपर्यंत नेल्याची माहिती दिली आहे. भारताच्या ‘रिझर्व्ह बँके’ने २०१९-२० या आर्थिक वर्षात ४० टनांहून अधिक सोने खरेदी केले आहे. त्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत खरेदी केलेल्या ६.८ टन सोन्याचाही समावेश आहे.

रशिया व भारताबरोबरच ‘संयुक्त अरब अमिरात’ने (यूएई) सात टन तर कझाकस्तानने २.८ टन व उझबेकिस्तानने २.२ टन  सोने खरेदी केल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल”ने दिली आहे.

leave a reply