कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीने शेअर बाजार व इंधनात घसरण

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनव्हायरसच्या साथीची दुसरी लाट धडकली आहे, असा इशारा अमेरिकेच्या वैद्यक क्षेत्रातील वरिष्ठ संशोधक विल्यम शाफनर यांनी दिला. अमेरिका व चीन या आघाडीच्या देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने शाफनर यांचा इशारा लक्षवेधी ठरतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला पुन्हा दणका देईल असे संकेत मिळत असून, शेअर बाजार व इंधनाच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे.

Coronaकोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेत लागू करण्यात आलेला लॉकडाउन उठविण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कारखाने, मॉल्स, शिक्षणसंस्था यांच्यासह सार्वजनिक कार्यक्रमांनाही हळूहळू परवानगी देण्यात येत आहे. ही प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. याकडे लक्ष वेधताना अमेरिकेच्या व्हॅण्डरबिल्ट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक व देशातील आघाडीचे वैद्यक तज्ञ विल्यम शाफनर यांनी, कोरोना साथीची दुसरी लाट सुरू झाली असल्याचा इशारा दिला.

‘साथीचे दुसरी लाट आधीच सुरू झाली आहे. आपण देशातील जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी पावले उचलत आहोत. जनतेकडून अजूनही सोशल डिस्टंसिंग व मास्कसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही. नागरिक दक्षता घेत नसून यातून कोरोनाव्हायरस पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फैलावण्याचा धोका आहे’, असे शाफनर यांनी बजावले. शॉपनर यांच्या इशाऱ्याला दुजोरा देणारी आकडेवारी अमेरिका व चीन या दोन्ही देशांमधून समोर येत आहे.

गेल्या तीन दिवसात चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना साथीच्या संसर्गाची ८० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. राजधानी बीजिंगमधील काही भाग लॉकडाउन करण्यात आला असून सुमारे ४० हजारांहून अधिक नागरिकांची चाचणी सुरू झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणेने दिली. बीजिंगव्यतिरिक्त साथीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहान व इतर शहरांमध्येही काही प्रकरणे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांना दुजोरा मिळत आहे.

Corona-stockexchangeअमेरिकेतही गेले तीन दिवस सातत्याने कोरोनाच्या हा रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. १२,१३ व १४ जून असे सलग तीन दिवस अमेरिकेत कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. टेक्‍सास, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया या प्रमुख राज्यांसह अमेरिकेच्या १० राज्यांमध्ये मोठी रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे. रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कोरोना साथीचा संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या २१ लाख ५० हजारांवर जाऊन पोहोचली आहे.

अमेरिका व चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचे पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी अमेरिकेसह युरोप व आशियाई देशांमधील शेअर बाजार दणकून आपटले आहेत. अमेरिकेतील डो जोन्स हा प्रमुख शेअर निर्देशांक तब्बल ७०० अंकांनी कोसळला. युरोपमधील प्रमुख शेअर बाजार एक ते दीड टक्‍क्‍यांनी घसरले असून आशियाई देशांनाही मोठा फटका बसला आहे. दक्षिण कोरियातील शेअरबाजार सुमारे पाच टक्क्यांनी आपटला असून जपानमधील निर्देशांकात साडेतीन टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. चीन हॉंगकॉंग व भारतातील शेअर निर्देशांकांनाही जबरदस्त धक्का सहन करावा लागला.

शेअरबाजारापाठोपाठ इंधन क्षेत्रातही घसरणीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाचे दर चार टक्क्यांहून अधिक घसरले असून प्रती बॅरल ३४.७५ डॉलर्सपर्यंत खाली आहेत. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधनाचे दरही अडीच टक्‍क्‍यांनी घसरून प्रती बॅरल ३७.७५ डॉलर्स असे नोंदविण्यात आले. इंधनाच्या मागणीतील घटही अद्याप कायम असून येत्या काळात दर अधिक घसरण्याचे संकेत तज्ञांकडून देण्यात आले आहेत.

leave a reply