छत्तीसगडमध्ये माओवाद्यांबरोबरील चकमकीत पाच जवान शहीद

- १२ जवान जखमी

रायपूर – शनिवारी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तररेमच्या जंगलांमध्ये माओवादी आणि सुरक्षादलांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये पाच जवानांना वीरमरण आले आहे, तसेच १२ जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत काही माओवादी ठार झाले असून त्यांनाही मोठे नुकसान उचलावे लागल्याच्या बातम्या आहेत. मात्र याबाबतची अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या भागात चकमक सुरू असून व्यापक शोध मोहिमही हाती घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

बिजापूर जिल्ह्यात तररेमच्या जंगलांमध्ये गस्तीवर असलेल्या ‘सीआरपीएफ’च्या ‘कोब्रा’ पथकाचे जवान, स्पेशल टास्क फोर्स आणि ‘जिल्हा राखीव दला’च्या (डीआरजी) जवानांचा माओवाद्यांशी झाला. दुपारी १२ च्या सुमारास ही चकमक उडाली. गस्ती पथकाला पाहताच माओवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र दुर्गम जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी लपलेले होते आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षादलांना नुकसान उचलावे लागल्याची माहिती समोर येत आहे.

‘सीआरपीएफ’चे तीन आणि ‘डीआरजी’चे दोन जवान या चकमकीत शहीद झाले आहेत. तसेच १२ जवान जखमी आहेत. या चकमकीच्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तिम्मपुरमपर्यंत जखमी जवानांना आणून तेथून ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर्सनी रुग्णालयात आणण्यात आले. तसेच या भागात अतिरिक्त कुमक पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आले.

या चकमकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी, माओवाद्यांविरोधी मोहिमेचे विशेष संचालक अशोक जुनेजा आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची एक तातडीची बैठक पार पडली. तररेमच्या जंगलात अजूनही चकमक सुरू आहे. चकमकीत काही माओवादीही ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच काही माओवादी जंगलात पाळून गेले आहेत. त्यामुळे या भागात व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर, सुकमा आणि दक्षिण बस्तरमध्ये एकाचवेळी माओवाद्यांविरोधात मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुमारे दोन हजार जवान या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसात माओवाद्यांच्या हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर ही मोहिम हाती घेण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले. तररेम जंगलातच याच मोहिमेअंतर्गत गस्त घालण्यात येत होती, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

दोन आठवड्यांपूर्वीच छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडविला होता. यामध्ये ‘डीआरजी’चे पाच जवान शहीद झाले होते. गेल्या महिन्यात बिजापूरमध्ये माओवाद्यांनी एका जिल्हा पंचायत सदस्यांची हत्या केली होती. तसेच धानोरा भागात ११ वाहनांना आगी लावल्या होत्या.

leave a reply