अफगाणिस्तानातील स्फोटांमध्ये पाच जणांचा बळी

- अमेरिकेकडून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन

काबुल/वॉशिंग्टन – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या स्फोटांमध्ये पाच जणांचा बळी गेला आहे. या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने राजधानी काबुलला लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात सुरू असलेला हिंसाचार थांबावा, असे आवाहन अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केले आहे.

शनिवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबुल तीन स्फोटांनी हादरली. यापैकी दोन स्फोट पंधरा मिनिटांच्या अंतराने झाले. तर तिसरा स्फोट दोन तासानंतर अफगाणी पोलिसांच्या वाहनावर झाला. या स्फोटात पाच जणांचा बळी गेला असून यात चार जवान तर एका अफगाणी नागरिकाचा समावेश आहे. तर किमान दोन जण जखमी झाल्याची माहिती अफगाणी पोलिसांनी दिली. या स्फोटांसाठी रिमोट कंट्रोलने नियंत्रित मॅग्नेट बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून राजधानी काबुल दहशतवादी हल्ल्यांचे केंद्र ठरले आहे. अफगाणी पोलीस, लष्कर तसेच प्रशासकीय अधिकारी आणि विद्यापीठातील प्राध्यापक व महिला शिक्षिकांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य केले जात आहे. यातील काही हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस’ने स्वीकारली होती. तर इतर हल्ल्यांसाठी तालिबानचे दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. कतारमधील वाटाघाटी अर्ध्यावर सोडल्यानंतर तालिबानने काबुलमधील हल्ले वाढविल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानातील या परिस्थितीवर अमेरिकेने मोठी घोषणा करण्याचे टाळले आहे. पण अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना अफगाणिस्तानातील हिंसाचार तत्काळ थांबविण्याचे आवाहन केले. तसेच अफगाणिस्तानातील सैन्यतैनाती किंवा माघार याबाबतचा कुठलाही निर्णय चर्चा करून मगच घेण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच १ मे पर्यंत अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार?घ्यावी, या तालिबानच्या मागणीवरही ठोस निर्णय झाला नसल्याचे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले. दरम्यान, येत्या काळात अफगाणिस्तानातील तालिबानचा धोका वाढेल, असा इशारा जर्मनीने दिला आहे.

leave a reply