मध्य चीनमध्ये आलेल्या महापुरात 56 जणांचा बळी

- 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा

56 जणांचा बळीबीजिंग/हेनान – मध्य चीनमधील हेनान प्रांतात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे 56 जणांचा बळी गेला असून अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. सोमवारपासून हेनान प्रांतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा दावा चीनच्या सरकारी माध्यमांनी केला आहे. येत्या काही दिवसात पुन्हा एकदा अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले असल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला अधिक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अतिवृष्टीमुळे चीनच्या राजवटीकडून करण्यात येणारे प्रगतीचे तसेच विकासाचे दावेही उघडे पडल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

हेनान प्रांतात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र सोमवार 19 जुलै ते 20 जुलै या 24 तासांच्या अवधीत हेनानची राजधानी झेंगझाऊ व परिसरात तब्बल 552.2 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस पडला. चीनच्या यंत्रणांनी केलेल्या दाव्यानुसार हा गेल्या हजार वर्षातील सर्वाधिक पाऊस आहे. या अतिवृष्टीने शहराची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग व भुयारी रेल्वेमार्ग जलमय झाले होते. झेंगझाऊ व नजिकच्या परिसरातील जवळपास चार लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

स्थानिक यंत्रणांच्या सहाय्यासाठी चीनच्या लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून शहर व नजिक च्या परिसरात बचावकार्य सुरू असून नागरिकांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही गाड्या पाण्याखाली असल्याचे चित्र असून अनेक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी झेंगझाऊ व जवळच्या परिसरात 56 जणांचा बळी गेला आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये बचाव पथके व यंत्रणा वेळेत पोहोचल्या नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

56 जणांचा बळीजुलै महिन्याच्या सुरुवातीलाच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्ताधारी राजवटीने आपली पाठ थोपटून घेतली होती. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचे व विकासाचे वर्णन करताना प्रगत अर्थव्यवस्थांनाही मागे टाकल्याचे दावे केले होते. सत्ताधारी राजवटीने विविध कार्यक्रम व प्रदर्शनांमधूनही प्रगतीचे मोठे दावे केले होते. मात्र हेनान प्रांतात झालेली अतिवृष्टी, चिनी यंत्रणांनी केलेली हाताळणी व नुकसानीचे दावे यातून कम्युनिस्ट राजवटीचे दावे पोकळ असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

हेनान प्रांताची राजधानी झेंगझाऊमध्ये ‘स्पाँज सिटी प्रोजेक्ट’ राबविण्यात आला होता. या प्रकल्पानुसार, शहरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित साठा तसेच निचरा करण्याची यंत्रणा उभारल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र 24 तासांमध्ये झालल्या पावसाने प्रकल्पाबाबत करण्यात आलेले दावे फोल ठरल्याचा दावा ‘बीबीसी न्यूज’ या ब्रिटीश वृत्तसंस्थेने केला. बीबीसीच्या या दाव्यावर चिनी माध्यमांकडून तिखट प्रतिक्रिया उमटली असून वृत्तसंस्थेचा अहवाल खोटा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेनान प्रांत चीनच्या आर्थिक प्रगतीतील महत्त्वाचा भाग मानला जातो. चीनच्या एकूण कृषी उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन एकट्या हेनान प्रांतात होते. हेनान प्रांताची राजधानी असणारे झेंगझाऊ शहर चीनमधील ‘नॅशनल सेंट्रल सिटीज्’पैकी एक असून व्यापार, वाहतूक, शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराचा जीडीपी एक ट्रिलियन युआनहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही एका पावसाने या प्रांताची व शहराची केलेली वाताहत चीनच्या सत्ताधारी राजवटीचे पितळ उघडे पाडणारी ठरली आहे.

leave a reply