दोन दशकांनंतर भारत पहिल्यांदाच ‘ट्रेड सरप्लस’मध्ये

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसमुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशातून होणाऱ्या निर्यातीत घट झाली, त्याचवेळी मागणीत घट झाल्याने आयातही घसरली आहे. यामुळे गेल्या १८ वर्षात प्रथमच देशाला व्यापारी तूट सहन करावी लागलेली नाही. आयातीपेक्षा निर्यात अधिक झाल्याने ‘ट्रेड सरप्लस’ दिसून आला आहे. जून महिन्यात ७९ कोटी डॉलर्स इतका ‘ट्रेड सरप्लस’ नोंदविण्यात आल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

Trade-Surplusनुकतेच रिझर्व्ह बँकेने मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. यानुसार २०१९-२० मध्ये व्यापारी तूट १५७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत आली आहे. याआधीच्या वर्षात ही व्यापारी तूट १८०.३ अब्ज डॉलर्स होती. यातून देशाची व्यापारी तूट घटत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे मार्चच्या अखेरीपासून कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे मागणीत मोठी घट झाल्याने आयात घसरली. गेल्या तीन महिन्यात आयात घसरल्याने आता ‘ट्रेड सरप्लस’ची स्थिती निर्माण झाली आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जून महिन्यात देशाच्या निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत १२.५१ टक्क्यांची घसरण झाली आहे. जून महिन्यात देशातून २१.९१ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. मात्र निर्यात घसरली असताना आयातही ४७.४९ टक्क्यांनी घटली आहे. जून महिन्यात देशात २१.११ अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली. त्यामुळे देशात प्रथमच आयातीपेक्षा निर्यात जास्त झाली आहे. जूनमध्ये एकूण ७९ कोटी डॉलर्सचा ट्रेड सरप्लस नोंदविण्यात आला आहे.

गेले सलग चार महिने निर्यातीमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. वस्त्र, अभियांत्रिकी साहित्य, दागिन्यांची निर्यात घटली आहे. मात्र एप्रिल, मे महिन्याच्या तुलनेत देशातील निर्यात स्थिती जून महिन्यात सुधारली आहे. पण त्याचवेळी देशात आयात स्थिती तशीच आहे. गेल्यावर्षीच्या जूनच्या तुलनेत इंधन तेलाची आयात ५५.२९ टक्क्यांनी कमी झाली आहे. ४.९३ अब्ज डॉलर्सचे इंधन तेल महिन्याभरात आयात करण्यात आले. तसेच सोने आयातही ७७ टक्क्यांनी घसरली आहे. कोळसा आयतीमध्येही घट नोंदविण्यात आली.

२००२ साली देशात १० अब्ज डॉलर्सचा ट्रेड सरप्लस नोंदविण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात ट्रेड सरप्लस नोंदवण्यात आला आहे. मे महिन्यात ‘बार्कलेज’ या आंतरराष्ट्रीय वित्त व ब्रोकरेज संस्थेने २०२०-२१ या वर्षात भारत ट्रेड सरप्लस नोंदवेल असा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षात भारतातून आयातीपेक्षा निर्यात जास्त होईल आणि यामुळे यावर्षी भारताचा ट्रेड सरप्लस अंदाजे २० अब्ज डॉलर्स इतका असेल, असा अंदाज ‘बार्कलेज’ने नोंदविला होता.

leave a reply