ताजिकिस्तानच्या दुशांबेमध्ये भारत व अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

दुशांबे – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीसाठी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये दाखल झाले. इथे त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद अत्मार यांची भेट घेतली. अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार व अफगाणी लष्कराबरोबरील तालिबानच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, बुधवारी एससीओच्या ‘कॉन्टॅक्ट ग्रूप’ची बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी भारत व अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये पार पडलेली चर्चा महत्त्वाची ठरते.

एससीओच्या या दुशांबे येथील बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई व पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद कुरेशी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर येणार आहेत. दोन्ही शेजारी देशांबरोबरील भारताचा तणाव वाढलेला असताना, एससीओची ही बैठक महत्त्वाची ठरते. अफगाणिस्तानातील परिस्थिती हा या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. एससीओने अफगाणिस्तानसाठी ‘कॉन्टॅक्ट ग्रूप’ची स्थापना केली असून यात भारत व पाकिस्तानचाही समावेश आहे. अफगाणिस्तानबाबत भारत आणि पाकिस्तानी परस्परविरोधी भूमिका लक्षात घेता सदर कॉन्टॅक्ट ग्रूपची ही बैठक लक्षवेधी ठरेल, असे संकेत मिळत आहेत.

ताजिकिस्तानच्या दुशांबेमध्ये भारत व अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेटसदर बैठकीच्या आधी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद अत्मार यांची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भेट घेतली. या भेटीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी सोशल मीडियावर दिली. दरम्यान, अफगाणिस्तानातील परिस्थितीकडे रशियाबरोबरच ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे मध्य आशियाई देश देखील गांभीर्याने पाहत आहेत.

अफगाणिस्तानातील अस्थैर्य व अराजक सीमा पार करून आपल्या देशात शिरकाव करील, अशी भीती या देशांना वाटत आहे. मात्र अफगाणिस्तानात स्थैर्य परतले, तर त्याचा फार मोठा लाभ या देशांना मिळू शकतो.

बंदर उपलब्ध नसलेल्या या मध्य आशियाई देशांना भारताबरोबरील व्यापार वाढवायचा आहे. त्यासाठी इराणच्या छाबहार बंदराचा वापर करून त्यामार्गे भारताबरोबरील मालवाहतूक करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर हे देश काम करीत आहेत. त्यामुळे एससीओच्या या बैठकीला धोरणात्मक महत्त्व आल्याचे दिसते. दरम्यान, एससीओच्या या बैठकीत चीन व पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री देखील सहभागी होत आहेत. लडाखच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही कमी झालेला नाही. या तणावाला चीनच जबाबदार असल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकताच केला होता.

रशियाच्या दौर्‍यात भारत-चीन सीमावादावर बोलताना जयशंकर यांनी चीन भारताबरोबरील सीमाकरार मान्य करायला तयार नाही व तसे करून चीनने उभय देशांच्या सहकार्याचा पायाच डळमळीत केला आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच भारत व चीनचे परराष्ट्रमंत्री ‘एससीओ’च्या निमित्ताने एकमेकांसमोर येत आहेत. तसेच पाकिस्तानने देखील आपल्या देशातील घातपातामागे भारत असल्याचे आरोप करून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात पाकिस्तानच्या हाती फारसे काही लागले नाही. मात्र यामुळे भारत व पाकिस्तानात चर्चा होण्याची शक्यता पूर्णपणे निकालात निघालेली आहे.

अफगाणिस्तानातील हिंसाचाराला शेजारी देशच जबाबदार असल्याचे सांगून भारत सातत्याने पाकिस्तानला लक्ष्य करीत आहे. ‘एससीओ’च्या व्यासपीठावर भारत पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील रक्तपातामागे पाकिस्तान असल्याचा आरोप अधिक तीव्रतेने करू शकेल. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडूनही त्याला दुजोरा मिळू शकेल. त्यामुळे एससीओची ही बैठक वादग्रस्त ठरू शकते.

leave a reply