मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष बॉम्बस्फोटात गंभीर जखमी

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली

माजी राष्ट्राध्यक्षमाले – मालदिवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि संसदेचे सभापती मोहम्मद नाशिद शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झाले आहेत. नाशिद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. नाशिद यांच्यावरील हल्ला हा मालदीवच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी केली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली तसेच नाशिद लढवय्ये असून ते लवकरच बरे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

गुरुवारी रात्री राजधानी मालेमधील नाशिद यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तीशाली स्फोट झाला. नाशिद त्यांच्या कारमध्ये बसत असताना हल्लेखोरांनी हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. नाशिद यांच्या कारजवळ पार्क करण्यात आलेल्या बाईकमध्ये स्फोटके पेरल्याचा संशय व्यक्त केला जातो. नाशिद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून गेल्या १६ तासात डोके, छाती, पोट आणि पायावरील दुखापतींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली.

माजी राष्ट्राध्यक्षया हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण मालदीवमधील कट्टरपंथी संघटना यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो. आपल्या देशात कट्टरपंथी संघटनांनी घुसखोरी केल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच नाशिद यांनी दिला होता. या हल्ल्याच्या चौकशीसाठी आणि मालदीवच्या सुरक्षा यंत्रणांना सहाय्य करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे विशेष पथक शनिवारी मालेमध्ये दाखल होणार आहे.

हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमुहांनी बनलेल्या देशाला गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यांनी हादरवून सोडले आहे. २००७ साली दहशतवाद्यांनी परदेशी पर्यटकांवर हल्ला चढविला होता. तर २०१५ साली तत्कालिन राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन हे बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावले होते.

दरम्यान, नाशिद यांच्यावर झालेल्या या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्याचा चीनने निषेध केला आहे.

leave a reply