बायडेन यांच्या अफगाण माघारीवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांची टीका

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलेल्या घोषणेवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या माघारीनंतर अमेरिकी जवानांना पुन्हा अफगाणिस्तानात तैनात करावेच लागेल, अशी परखड प्रतिक्रिया माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी नोंदविली. तर माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी बायडेन यांच्या निर्णयाचे समर्थन करता येणार नाही, असे बजावले आहे.

बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडेन हे उपराष्ट्राध्यक्ष तर क्लिंटन ह्या परराष्ट्रमंत्री होत्या. त्यामुळे क्लिंटन यांनी बायडेन यांच्या या निर्णयावर केलेली टीका लक्षवेधी ठरते. तर अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्धाची घोषणा करणारे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या प्रशासनात राईस परराष्ट्रमंत्री होत्या. ही सैन्यमाघार घेतली असली तरी अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिम सुरूच ठेवावी लागेल, असे राईस व क्लिंटन म्हणाल्या. तर येत्या काळात दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अफगाणिस्तानात पुन्हा सैन्यतैनाती करावी लागेल, असे राईस यांनी म्हटल्याची बातमी अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली.

अमेरिकन सिनेटच्या फॉरिन अफेअर्स कमिटीसमोर झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना या दोन्ही माजी परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्याचे, सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

leave a reply