भारतात चोवीस तासात कोरोनाच्या चार लाख रुग्णांची नोंद

- तीन लाख रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली – देेशात चोवीस तासात कोरोनाचे चार लाख रुग्ण आढळले. जगभरात आतापर्यंत केवळ भारतातच एका दिवसात उच्चांकी चार लाखांहून अधिक रुग्ण नांेंदविले गेले आहेत. येत्या काही दिवसातच देशात दरदिवशी आढळणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या पाच लाखांवर पोहोचेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. २१ एप्रिलला देशात पहिल्यांदा तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यानंतर दहा दिवसातच चोवीस तासात आढळत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशात चार लाखांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरेही होत आहेत. शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सुमारे तीन लाख रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक बातमी आहे.

Advertisement

एप्रिल महिन्यात देशात ४४ हजार रुग्णांचा बळी गेला, तर ६० लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार १५ मे मपर्यंत देशात कोरोनाची साथ शिखर गाठेल, तर मेच्या अखेरीस रुग्णांची संख्या कमी होत जाईल. मात्र सध्या वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्याचा आरोग्य सुविधांवर पडणार ताण प्रचंड आहे. सध्या देशातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२ लाखांवर पोहोचली आहे. देशात महाराष्ट, दिल्लीसह दहा राज्यात परिस्थिती बिकट आहे आणि याच राज्यात ७४ टक्के रुग्णांची नांेंद होत आहे. शनिवारीही महाराष्ट्रात ८०२ रुग्णांचा बळी गेला, तसेच ६३ हजार २८१ नवे रुग्ण आढळले. मुंबईत सुमारे ४ हजार रुग्णांची नोंद झाली, तर ९० जणांचा बळी गेला. नागपूरात ९९ जण दगावले आणि ६ हजार ५७६ नवे रुग्ण आढळले.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण हे कर्नाटकात आढळत आहे. कर्नाटकात शनिवारी ४० हजार नव्या रुग्णांची नांेंद करण्यात आली, तसेच २७१ जणांचा बळी गेला. केरळामध्ये ३५ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. ४८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात चोवीस तासात कोरोनाचे ३०३ रुग्ण दगावले असून ३० हजार ३०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेश या राज्यातच १ लाख ६५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असून १४०० हून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे.

शनिवारी राजस्थानात १६० जण दगावले, १७ हजार ५५२ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २७ हजार, तमिळनाडून २० हजार, पश्‍चिम बंगालमध्ये १७ हजार, मध्य प्रदेशात १२ हजार, तेलगंणात ७ हजाराहून अधिक रुग्ण दरदिवशी आढळत आहेत.

दरम्यान, शनिवारपासून देशातील काही भागांमध्ये १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीचा पुरवठा कमी असल्याने, तर काही राज्यांना लस अजून वितरीत झाल्या नसल्याने सर्वत्र लसीकरण सुरू होऊ शकलेले नाही. येत्या काळात लसीचा पुरवठा जसा सुरळीत होईल, तसे तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणालाही वेग येईल. महाराष्ट्रात शनिवारी ३६ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. एका दिवसात १८ ते ४४ वयोगटातील ११ हजार नागरिकांना लस देण्यात आली. यातील पुण्यात १३०० आणि मुंबईत हजार जणांचे लसीकरण झाले. नागरिकांनी कोविन ऍप्सवर रजिस्ट्रेशन करून ज्यांनी लसीकरणाची तारीख मिळाली आहे, त्यानींच सांगितलेल्या लसीकरण केंद्रावर यावे. उगाच गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

leave a reply