‘एफपीआय’ची शेअर बाजारात चार दिवसात आठ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – भारतात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वेगाने कमी होत आहे आणि उद्योगांच्या उलाढालीमध्ये वाढ झाली आहे, तसे परकीय गुंवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक वाढविल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात जून महिन्याच्या पहिल्या चार सत्रातच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआयस्) अर्थात परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ‘एफपीआय’नी आतापर्यंत 55,741 हजार कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केल्याची माहिती उघड होत आहे.

‘एफपीआय’कोरोनाचे संकट असले तरी परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारावर सातत्याने विश्‍वास दाखवत आहेत. यावर्षी जगात सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. चीनपेक्षाही भारताचा विकास दर कितीतरी अधिक राहणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. भारताची अर्थव्यवस्था 12 टक्क्याहून अधिक वेगाने विकास करेल, असे अंदाज याआधी आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी व्यक्त केले होते. मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर यामध्ये सुधारणा करून हा अंदाज 10 ते 11 टक्के करण्यात आला असला, तरी भारतीय अर्थव्यवस्था दोन अंकी विकासदर गाठण्यात यशस्वी ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नुकतेच भारताच्या उत्पादन दरात वाढ झाल्याचे, निर्यात वाढल्याचे, तसेच भारताकडील परकीय गंगाजळी 600 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले होते. यानंतर आता ‘एफपीआय’च्या गुंतवणुकीतूनही भारताच्या अर्थव्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा विश्‍वास दिसून येत आहे.

‘एफपीआय’‘एफपीआय’नी 1 ते 4 जून या जून महिन्यातील पहिल्या चार सत्रातच 7 हजार 968 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारामध्ये केली आहे. याशिवाय कर्जरोख्यांमध्ये 22 कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लॉकडाऊनमुळे?भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. केवळ भारतीयच नाही जगातील सर्वच अर्थव्यवस्था अशा प्रकारच्या संकटाचा सामना करीत होत्या. याकाळात ‘एफपीआय’ने भारतीय बाजारात गुंतवणुकीसाठी हात आखडता घेतला होता. उलट मोठ्या प्रमाणावर ‘एफपीआय’ भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले होते. मात्र ऑक्टोबर 2020 मध्ये परिस्थिती पुन्हा सामान्य होण्यास सुरूवात झाल्यावर ‘एफपीआय’नी भारतीय बाजारात गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या काळात भारतीय शेअर बाजारात ‘एफपीआय’नी 1 लाख 97 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मार्चपासून देशात दुसरी लाट सुरू झाली. मात्र त्यानंतर गुंतवणुकीचा हा ओघ थांबलेला नाही. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच ‘एफपीआय’नी भारतीय शेअर बाजारात 55,741 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारतात लसीकरण वाढत जाईल आणि अर्थव्यवस्था कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून बाहेर पडून पुर्वपदावर येईल, तसा ‘एफपीआय’ आणखी मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारात गुंतवणूक करतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply