इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहचत असताना अणुकरारावर फेरविचार करण्याची फ्रान्सची मागणी

फेरविचार

पॅरिस/तेहरान – गेल्या काही आठवड्यांपासून अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र करणारा इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहोचत आहे. त्यामुळे २०१५ सालच्या अणुकरारावर तातडीने फेरविचार करून हा करार पुन्हा लागू करण्यासाठी अमेरिका आणि इराणने तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ‘जीन य्वेस ले द्रियान’ यांनी केली. फ्रान्सपाठोपाठ ब्रिटन आणि जर्मनी या युरोपिय देशांनी देखील कठोर भूमिका घेत अणुकरार वाचवायचा असेल तर इराणने त्याचे उल्लंघन थांबवावे, असे बजावले आहे. फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या विधानांवर इराणने आक्षेप घेतला असून त्यावर जळजळीत टीका केली आहे.

या महिन्यात इराणने आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इराणने फोर्दो येथील अणुप्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करून २०१५ सालच्या अणुकराराचे आणखी एकदा उल्लंघन केले. युरेनियमच्या संवर्धनाबरोबर इराणने अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेसची संख्या वाढविण्याची घोषणाही केली होती. तर काही दिवसांपूर्वी इराणने अणुप्रकल्पात वापरल्या जाणार्‍या युरेनियम मेटलच्या निर्मितीसाठी जुळवाजुळव सुरू केल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला कळविले होते.

फेरविचार

इराणच्या या हालचालींवर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राफेल ग्रॉसी यांनी चिंता व्यक्त करून इराणबरोबर अणुकरार करणार्‍या आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध केले होते. इराण अतिशय वेगाने युरेनियमचे संवर्धन करू लागला आहे. ते पाहता, इराणबरोबरील अणुकरार वाचविण्यासाठी आपल्याकडे महिने नाही तर अवघे काही आठवडे शिल्लक असल्याचे ग्रॉसी म्हणाले होते. इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग आणि इराणकडे असलेल्या यंत्रणेचा दाखला दिला होता. या दोन्हीच्या सहाय्याने इराण महिन्याभरात १० किलो किंवा त्याहून थोडे अधिक युरेनियमचे संवर्धन पूर्ण करू शकतो, असा इशारा ग्रॉसी यांनी दिला होता.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमातील घडामोडींबाबत दिलेल्या या इशार्‍यावर, फ्रान्सचे पररराष्ट्रमंत्री द्रियान यांनी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत चिंता व्यक्त केली. तसेच ‘अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र करणार्‍या इराणला रोखावेच लागेल. कारण इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहोचत आहे, हे स्पष्टपणे सांगतो’, असे फ्रेंच परराष्ट्रमंत्री म्हणाले.

फेरविचार

तसेच २०१५ सालच्या अणुकरारावर फेरविचार करून भागणार नाही. तर इराणच्या क्षेपणास्त्रनिर्मितीवर आणि इराणमुळे शेजारी आखाती देशांमध्ये वाढत असलेल्या अस्थैर्यावरही चर्चा करावी लागेल, असे परराष्ट्रमंत्री द्रियान म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या दबावामुळे इराणच्या अणुकार्यक्रमापासून असलेला धोका आणि संकट वाढल्याची टीका फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी केली. फ्रान्स, ब्रिटन व जर्मनी या देशांनी पुन्हा एकदा संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इराणला अणुकराराच्या नियमांच्या चौकटीत राहण्याची सूचना केली.

अणुप्रकल्पात युरेनियम मेटल नागरी वापरासाठी केला जात नाही. त्यामुळे इराण आपल्या या पावलाचे कुठल्याही प्रकारे समर्थन करू शकत नाही, याची जाणीव युरोपिय देशांनी करून दिली. तसेच युरेनियम मेटलचा वापर लष्करी कारणासाठी केला जात असेल, तर त्याचे परिणामही गंभीर असतील, असा इशारा युरोपिय देशांनी दिला.

फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांची विधाने पूर्णपणे मुर्खपणाची असल्याचे ताशेरे इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी ओढले. ‘आपल्या परराष्ट्र मंत्रालयातील पहिल्या दिवशी येमेनमधील संघर्षासाठी सौदी अरेबियाला शस्त्रास्त्रे पुरविणार्‍या नेत्याने अशी मुर्खपणाची विधाने करू नये’, असे झरिफ यांनी सुनावले. तर ‘आखातातील अस्थैर्यासाठी इराण नाही तर तुम्हीच जबाबदार आहात. आपल्यावरील टीकाकारांचे हात तोडणार्‍यांचे तुम्हीच समर्थन केले. तुम्हीच पुरविलेल्या शस्त्रास्त्रांद्वारे सौदी येमेनमधील मुलांवर शस्त्र रोखत आहे’, असा आरोप इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला.

leave a reply