‘ऑकस डील’मुळे नाराज झालेल्या फ्रान्सने अमेरिका व ऑस्ट्रेलियातील राजदूतांना माघारी बोलावले

अमेरिका व ऑस्ट्रेलियापॅरिस/वॉशिंग्टन/कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाने अमेरिकेबरोबर केलेल्या पाणबुड्यांच्या कराराने फ्रान्स चांगलाच दुखावल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी फ्रान्सने या कराराच्या मुद्यावरून अमेरिका व ऑस्ट्रेलियामधील आपले राजदूत माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. अमेरिका व ऑस्ट्रेलियाने घेतलेले निर्णय अत्यंत गंभीर असल्याने राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागला, असे फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी या निर्णयावर खंत व्यक्त केली असून फ्रान्स महत्त्वाचा भागीदार असल्याचा खुलासा केला आहे.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार अमेरिका व ऑस्ट्रेलियातील फ्रेंच राजदूतांना तातडीने माघारी बोलावण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया व अमेरिकेने १५ सप्टेंबरला केलेल्या घोषणा अत्यंत गंभीर स्वरुपाच्या असून, त्या अनुषंगाने हा अपवादात्मक निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया व फ्रान्समधील पाणबुडी करार रद्द करणे आणि अमेरिकेबरोबर आण्विक पाणबुड्यांसाठी भागीदारी करणे या दोन्ही गोष्टी मित्रदेश तसेच भागीदारांच्या अस्वीकारार्ह वर्तनाचा भाग ठरतो. याचा थेट परिणाम युरोपला वाटणारे इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे महत्त्व व फ्रान्सच्या या क्षेत्रातील आघाड्या तसेच भागीदार्‍यांवर होऊ शकतो’, अशा आक्रमक शब्दात फ्रेंच परराष्ट्रमंत्री जीन य्वेस-द्रिआन यांनी निर्णयाची माहिती दिली.

फ्रान्सच्या या निर्णयावर अमेरिका व ऑस्ट्रेलियाकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘फ्रान्स हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार व जुन्या सहकारी देशांपैकी एक आहे. फ्रान्सबरोबरचे आमचे संबंध अत्यंत मौल्यवान आहेत. कराराच्या मुद्यावर फ्रान्सबरोबर उच्च स्तरावर संवाद साधला जाईल’, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी सांगितले. अमेरिका व फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान या मुद्यावर प्राथमिक बोलणी झाल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राजदूत माघारी बोलावण्याच्या फ्रान्सच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाने खंत व्यक्त केली आहे. फ्रान्सबरोबरचे आमचे संबंध महत्त्वाचे असून विविध मुद्यांवर फ्रान्सबरोबर असलेले सहकार्य पुढे कायम राहिल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी, पाणबुड्यांसंदर्भातील करार रद्द होऊ शकतो यासंदर्भात फ्रान्सला संकेत देण्यात आले होते, असे वक्तव्य केले आहे. जून महिन्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत बोलताना, राष्ट्रीय सुरक्षा व हितसंबंधांच्या दृष्टिने ऑस्ट्रेलिया वेगळा निर्णय घेऊ शकतो, असे बजावल्याचा दावा मॉरिसन यांनी केला.

फ्रान्स व ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या करारानुसार, फ्रान्स ऑस्ट्रेलियाला १२ पारंपारिक ‘अटॅक सबमरिन्स’ पुरविणार होता. हा करार सुमारे ५० अब्ज डॉलर्सचा होता. करारासंदर्भात दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही झाल्याचे समोर आले होते.

leave a reply