चीनची लुटमार रोखण्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार घेतला; फ्रान्स दक्षिण पॅसिफिक देशांच्या साथीने संयुक्त तटरक्षक दल उभारणार

लुटमारपॅरिस – दक्षिण पॅसिफिक सागरी क्षेत्रात मासेमारीच्या नावाखाली लुटमार करणार्‍या चीनला उत्तर देण्यासाठी दक्षिण पॅसिफिक देशांच्या तटरक्षकदलांचे नेटवर्क उभारणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केली. थेट उल्लेख टाळला असला तरी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ही घोषणा चीनच्या आक्रमक सागरी हालचालींविरोधात असल्याचा दावा केला जातो. याआधीच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी फ्रान्सने भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर लष्करी सहाय्य वाढविण्याला प्राधान्य दिले आहे.

फ्रान्सची हिंदी महासागर क्षेत्रात रियुनियन आयलँड तर पॅसिफिक महासागरातील फ्रेंच पॉलिनेशिया, न्यू कॅलेडोनिया ही बेट प्रदेश आहेत. या बेटांच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच वर्षांपासून ‘फ्रान्स-ओशियनिया’ बैठकीचे आयोजन केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह ऑस्ट्रेलिया, मार्शल आयलँड, पापुआ न्यू-गिनीचे राष्ट्रप्रमुख तर न्यूझीलंड व इतर पॅसिफिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दक्षिण पॅसिफिक सागरी क्षेत्रातील आक्रमकतेचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी यावेळी मांडला.

लुटमार‘गेली काही वर्षे आपण सारे मासेमारीच्या नावाखाली होणार्‍या लुटमारीचे बळी ठरत आहोत. याविरोधात दक्षिण पॅसिफिक देशांचे सहकार्य आवश्यक असून लवकरच येथील देशांचे तटरक्षकदलांचे जाळे उभारणार आहोत’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केली. दक्षिण पॅसिफिक क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण, लष्करी सहकार्य या उद्दिष्टांवर हे सहकार्य आधारलेले असेल, असे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.या बैठकीत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी चीनचा उघडपणे उल्लेख करण्याचे टाळले. पण काही देश या सागरी हद्दीत घुसखोरी करून करीत असलेल्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी हे सहकार्य असल्याचे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांमध्ये चीनची ही लुटमार करणारी मासेमारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वच देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

आपल्या सागरी क्षेत्रातील मासेमारीशिवाय चीनच्या मच्छिमार नौकांनी सुरुवातीला ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात घुसखोरी करून मासेमारी सुरू केली होती. यासाठी चिनी मच्छिमार नौका तसेच मिलिशिया फ्लोटिलांनी फिलिपाईन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना उघड झाल्या होत्या. फिलिपाईन्सच्या हद्दीत एकाचवेळी अडीचशे जहाजांनी नांगर टाकला होता. गेल्या वर्षी चिनी मच्छिमार नौकांनी हिंदी महासागर तसेच ऑस्ट्रेलिया व लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाच्या हद्दीपर्यंत धडक मारली होती. गेल्या आठवड्यातच पाकिस्तानने चीनच्या पाच मच्छिमार जहाजांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली होती.

leave a reply