माजी लष्करी अधिकार्‍यांच्या पत्राला फ्रान्सच्या जनतेचा पाठिंबा

पॅरिस – कट्टरवाद्यांकडून मिळत असलेल्या आव्हानांमुळे फ्रान्सच्या समोर गंभीर संकट खडे ठाकले असून या कट्टरवाद्यांमुळे आपल्या देशाच्या ठिकर्‍याही उडू शकतात, असा इशारा फ्रान्सच्या २० माजी लष्करी अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांना काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यांच्या या पत्राला फ्रान्समधील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे. या कट्टरवाद्यांवर कारवाई केली नाही तर फ्रान्सच्या ठिकर्‍या उडू शकतात, असे ७३ टक्के जनतेला वाटत आहे. फ्रान्समध्ये कट्टरवाद फोफावत असून ही फार मोठ्या चिंतेची बाब बनल्याचा दावा येथील उजव्या गटाचे नेते आणि निरिक्षक करीत आहेत. कट्टरवाद्यांच्या वाढत्या प्रभावाकडे फार काळ दुर्लक्ष करणे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नसेल, असा इशारा निरिक्षकांकडून दिला जातो. चार दिवसांपूर्वी फ्रेंच लष्कराच्या जनरल पदावरुन निवृत्त झालेल्या २० अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना देशाच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिले होते.

तसेच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कट्टरवादाविरोधात पावले उचलली नाही तर लष्कराकडे कारभार सोपविण्याची मागणी या माजी अधिकार्‍यांनी केली होती. फ्रान्सच्या लष्करात सेवेत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या सुमारे एक हजार जवानांनी या पत्रावर स्वाक्षरी करून आपले समर्थन दिले होते. फ्रान्सचे पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी लष्करी अधिकार्‍यांच्या या पत्रावर टीका केली होती.

आता फ्रेंच जनतेमधूनही लष्करी अधिकार्‍यांच्या पत्रावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या पत्राला ७३ टक्के जनतेने पाठिंबा दिला असला तरी ४९ टक्के जनतेला लष्कराने सत्ता हाती घ्यावी, असे वाटत आहे.

leave a reply