एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मिळणार

४५ वर्षांवरीलनवी दिल्ली – १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सरसकट सगळ्या नागरिकांना कोरोनाची लस मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लसीकरणाचा वेगही आणखी वाढणार आहे.

जानेवारीच्या मध्यापासून देशात कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुरूवातीच्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्स, पोलीस यांना कोरोनाची लस देण्यात आली. तर दुसर्‍या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली. १ मार्चपासून दुसर्‍या टप्प्यातील हा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. याच टप्प्यात ४५ ते ६० वर्षांमधील व्याधीग्रस्त नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. यासाठी अशा नागरिकांना डॉक्टरांकडून आपल्या आजाराबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

मात्र दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणासाठीची वयोमर्यादा कमी करून ४५ वर्षांवरील सरसकट सर्वांनी लस देण्यात यावी, अशी मागणी होत होती. यावर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आता ४५ वर्षांवरील सरसकट सर्वांना लस मिळू शकेल. १ एप्रिलपासून ४५ वर्षार्ंवरील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी होईल, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. देशात आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख जणांना लस देण्यात आली आहे. यातील ४५ लाख जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच सोमवार ते मंगळवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ३२ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. सध्या देशात सरासरी दिवसाला १५ लाख इतक्या जणांना लस मिळत असून लसीकरणाचा हा वेग जगात सर्वाधिक आहे.

leave a reply