देशातील इंधनाची मागणी पूर्वपदावर येईल – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित झाले. याचा परिणाम इंधनाच्या मागणीवर झाला. एप्रिल महिन्यात देशातील इंधनतेलाची मागणी ७० टक्क्यांनी घटली होती. पण आता हळूहळू मागणी वाढू लागली असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे.

देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर, एप्रिल महिन्यात इंधनाची मागणी ७० टक्क्यांनी घटली होती. जगभरात हीच परिस्थिती होती. काही देशांनी तर रिफायनरी बंद केल्या होत्या. पण त्या मानाने भारतात परिस्थिती खूपच बरी होती, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. आता केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता झाल्यानंतर इंधनाच्या मागणीत वाढ झाल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. मे महिन्यात इंधनाच्या मागणीत ६० ते ६५ टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रधान पुढे म्हणाले. जून महिन्यापर्यंत सर्व काही पहिल्यासारखे सुरळीत झालेले असेल, असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. रस्त्यावर नेहमी सारख्या दुचाकी आणि मोटारी धावू लागल्यावर पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ होईल. तसेच २५ मे पासून देशातंर्गत विमानसेवा आणि पुढच्या महिन्यात ट्रेन्स सुरु होणार आहेत. त्यानंतर सर्व चित्र बदलेले असेल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढविल्या नाहीत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेमुळे पुढच्या काळात इंधनाच्या किंमती स्थीर राहतीलच, याची शाश्वती देता येणार नाही, असे पेट्रोलियम मंत्र्यांनी बजावले आहे.

leave a reply