‘ओपेक’ व सहकारी देशांमध्ये झालेल्या करारानंतर इंधनाच्या दरांमध्ये अडीच टक्क्यांची घसरण

अडीच टक्क्यांची घसरणरियाध/दुबई/मॉस्को – इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ या गटांमध्ये झालेल्या बैठकीत इंधनपुरवठा वाढविण्याच्या करारावर एकमत झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीदरम्यान सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) वाद विकोपाला गेल्याने कोणताही करार होऊ शकला नव्हता. मात्र दोन्ही देशांनी वाद मिटविल्यानंतर करार झाल्याचे सांगण्यात येते. या करारानंतर इंधनाच्या दरांमध्ये तब्बल अडीच टक्क्यांची घसरण झाली असून दर 71.5 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत.

इंधन उत्पादक देशांच्या बैठकीत झालेल्या करारानुसार, ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सने अडीच टक्क्यांची घसरणवाढविण्यात येणार आहे. सौदी अरेबिया व रशियाला प्रतिदिन एक लाख बॅरल्स उत्पादन वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. युएईला प्रतिदिन 29 हजार बॅरल्सने उत्पादन वाढविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्याचवेळी इंधन उत्पादनाच्या कपातीसंदर्भातील ‘बेसलाईन’मध्येही बदल करण्यात आला आहे. युएईबरोबरच इराक व कुवेत या दोन्ही देशांनाही उत्पादनाचा कोटा वाढवून देण्यात आला आहे. कराराची मुदत डिसेंबर 2022पर्यंत राहणार आहे.

कोरोना साथीच्या कालावधीत इंधनाची मागणी घटल्याने ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ सदस्य देशांनी इंधनाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला होता. इंधनाच्या उत्पादनात जवळपास एक कोटी बॅरल्स प्रतिदिन इतकी कपात करण्यात आली होती. मात्र आता इंधनाची मागणी पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने इंधन उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘ओपेक’ची बैठक आयोजित अडीच टक्क्यांची घसरणकरण्यात आली होती. या बैठकीत इंधन उत्पादन वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

बैठकीत सौदी अरेबियाने उत्पादनवाढीबाबत मांडलेल्या प्रस्तावाला ‘युएई’ने विरोध केला होता. उत्पादनात वाढ आवश्यक असली तरी आपल्याला कोटा वाढवून हवा असल्याची आग्रही भूमिका युएईने घेतली होती. मात्र युएईच्या मागणीला सौदी व इतर देशांनी नकार दिला. सौदी व युएईमधील मतभेदांमुळे ‘ओपेक प्लस’ची बैठक रद्द करण्यात आली होती. आतापर्यंत ओपेकने घेतलेल्या बहुतांश निर्णयांमध्ये सौदी व युएईची एकजूट दिसून आली होती. मात्र यावेळी प्रथमच दोन देशांमधील मतभेद ऐरणीवर आल्याने ही बाब ‘ओपेक’मधल्या फुटीचे संकेत ठरु शकतात, असे सांगण्यात येत होते.

मात्र सध्यातरी हे मतभेद दूर झाल्याचे ‘ओपेक’ व सहकारी देशांच्या बैठकीत झालेल्या करारावरून स्पष्ट झाले आहे. इंधनपुरवठ्यासंदर्भात झालेल्या या कराराचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठे उमटले आहेत. ‘ब्रेंट क्रूड’ इंधनाच्या दरांमध्ये सोमवारी 2.7 टक्क्यांची घसरण झाली असून दर 71.58 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. तर अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 2.06 डॉलर्सची घसरण झाली असून दर 70 डॉलर्स प्रति बॅरलहून खाली आल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंधनाच्या उत्पादनात झालेली वाढ व दरांमधील घसरण यामुळे जपान, भारत यासारख्या प्रमुख आयातदार देशांना दिलासा मिळण्याची शक्यता विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply