भविष्यातील युद्ध देशात तयार झालेल्या शस्त्रांनीच जिंकू

-संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा विश्‍वास

नवी दिल्ली – ‘भविष्यातील युद्ध भारत देशातच तयार झालेल्या शस्त्रांचा वापर करून जिंकेल’ असा विश्‍वास संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन-डीआरडीओ’ने लावलेला कामाचा धडाका पाहता आपल्याला याची खात्री पटल्याचे संरक्षणदल प्रमुखांनी म्हटले आहे. ‘‘शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या निर्मितीमध्ये देशातील खाजगी कंपन्या स्वारस्य घेत असून त्याचा उत्साह वाढविण्याची गरज आहे. ‘डीआरडीओ’ने त्यांना सहकार्य करावे’’, अशी अपेक्षा संरक्षणदलप्रमुखांनी व्यक्त केली.

डीआरडीओने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षणदलप्रमुख बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून ‘डीआरडीओ’ने केलेल्या कामामुळे भारतीय संरक्षणदल अधिक आत्मनिर्भर बनल्याचे सांगून यावर जनरल रावत यांनी समाधान व्यक्त केले. ‘‘देशासमोर खड्या ठाकलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करीत असताना, संरक्षणदलांची आत्मनिर्भरता अतिशय महत्त्वाची ठरते. डीआरडीओने लावलेला कामाचा धडका असाच कायम राहिला, तर भविष्यातील युद्ध किंवा देशावर लादण्यात आलेली युद्ध संरक्षणदल देशी बनावटीच्या शस्त्रांनीच लढेल आणि त्यात विजय मिळविल,’’ असे जनरल रावत यांनी म्हटले आहे.

चीन व पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता, भारताला आपल्या उत्तर व पश्‍चिम सीमेवर सुरक्षाविषयक आव्हान मिळत आहे, असे उद्गार जनरल रावत यांनी काढले. अशा काळात शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची निर्मिती करण्यासाठी उत्सुकता दाखविणार्‍या खाजगी कंपन्यांना ‘डीआरडीओ’च्या सहकार्याची आवश्यकता आहे. ‘डीआरडीओ’ने नवी शस्त्रास्त्रे व संरक्षणविषयक यंत्रणांची निमिर्ती करावी व यासाठी खाजगी कंपन्यांना प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षाही संरक्षणदलप्रमुखांनी यावेळी व्यक्त केली.

गुरुवारी पार पडलेल्या ‘डिफेन्स अ‍ॅक्विझेशन काऊन्सिल’च्या (डीएसी) बैठकीत जवळपास तीस हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा निर्णय झाला. यातील ९० टक्के इतकी शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्याची निर्मिती ‘मेक इन इंडिया’अंतर्गत होणार आहे. यात ‘डीआरडीओ’ची अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल, असे सांगून संरक्षणदलप्रमुखांनी या ‘डीआरडीओ’चे कौतुक केले. एकाच दिवसापूर्वी ‘डीआरडीओ’ एअर इंडियाच्या ३२०एस या विमानाचे टेहळणी विमानात रुपांतर करणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या विमानावर अवॅक्स यंत्रणा बसवून सुमारे सहा टेहळणी विमाने तयार करण्याची योजना डीआरडीओने आखली आहे. चीन व पाकिस्तानकडून एकाच वेळी मिळत असलेल्या आव्हानांचा विचार करता डीआरडीओकडून सुरू असलेले हे प्रयत्न लक्षवेधी ठरतात.

leave a reply