‘जी7’ने जैविक धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करावी – अमेरिकेच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारांचे आवाहन

वॉशिंग्टन – गेल्या दीड वर्षात कोरोनाने जगभरात 39 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला. पण हा धोका इथेच संपणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय नेते, विश्लेषक बजावत आहेत. ‘औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या जी7 देशांनी पुढच्या जैविक धोक्यासाठी सज्ज रहावे. यासाठी जी7 देशांना या धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करावी लागेल’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागार दलिप सिंग यांनी दिला. त्याचबरोबर इतर देशांना कर्ज देण्याची चीनची प्रक्रिया अत्यंत अपारदर्शी असल्याची टीका दलिप सिंग यांनी केली.

‘सेंटर फॉर स्ट्रटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज इकोनॉमिक्स प्रोग्राम’ या अभ्यासगटाच्या व्हर्च्युअल बैठकीत बोलताना दलिप सिंग यांनी जी7 देशांना आगामी जैविक धोक्याची जाणीव करुन दिली. ‘आपल्याला पुढील जैविक धोक्यासाठी तयारी सुरू करायची आहे आणि यासाठी धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करावी लागेल. त्याचबरोबर, या जैविक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एकजूट व्हावे लागेल आणि सर्व देशांच्या समन्वयाने काम करावे लागेल व यासाठी कोणत्याही छुप्या अटी, शर्ती लादल्या जाऊ नये’, असे दलिप सिंग म्हणाले. त्याचबरोबर जी7 देशांनी जगभरातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन दलिप सिंग यांनी केले.

‘आगामी काळातील जैविक धोक्याविरोधात जी7 देश जितकी प्रगल्भ आणि आक्रमक भूमिका स्वीकारतील, तितक्या अधिक प्रमाणात आपण या धोक्याचा वेग कमी करून तो नियंत्रित करता येईल’, असा दावा दलिप सिंग यांनी केला. आगामी काळातील जी7 व जी20च्या बैठकीत यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सिंग म्हणाले. जी7 आणि जी20 गटाचे शेर्पा अर्थात अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी म्हणून बायडेन प्रशासनाने दलिप सिंग यांना नियुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारांनी आगामी जैविक धोक्याबाबत केलेल्या आवाहनाकडे पाहिले जाते.

आगामी जैविक धोक्याचा इशारा देताना, दलिप सिंग यांनी चीनचा उल्लेख करण्याचे टाळले. पण गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये पार पडलेल्या जी7च्या बैठकीत कोरोनाच्या साथीवरुन चीनला लक्ष्य करण्यात आले होते. कोरोनाच्या साथीबाबत चीनची भूमिका संशयास्पद ठरते, असे संकेत देऊन जी7च्या सदस्यदेशांनी याबाबत चीनने पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी केली होती.

कोरोनाची साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली, असा थेट आरोप अद्याप जी7च्या कुठल्याही सदस्यदेशाने अधिकृत पातळीवर केलेला नाही. मात्र कोरोनाच्या विषाणूबाबत चीन करीत असलेले दावे यापुढे स्वीकारता येणार नाही, असे संकेत जी7 देशांनी दिले आहेत. अमेरिका, ब्रिटनमधील काही विश्लेषक व संशोधकांनी कोरोनाच्या साथीसाठी चीनला जबाबदार धरले होते. त्यामुळे पुढच्या काळात यावरून जी7 तसेच अन्य देशांचे चीनवरील दडपण वाढत जाणार असल्याचे दिसू लागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विरोधात जाणारे वातावरण पाहून चीन बिथरल्याचे समोर येत आहे.

leave a reply