‘कोविशिल्ड’च्या दोन डोसमधील अंतरात वाढ

‘कोविशिल्ड’नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींद्वारे भारतात लसीकरण सुरू असून या लसींचे २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येतात. मात्र ‘कोविशिल्ड’च्या बाबतीत दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे व तशा सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही नवी गाईडलाईन काढण्यात आल्याची माहिती अधिकार्‍याने दिली.

यानुसार ‘कोविशिल्ड’ दोन लसींमधील अंतर चार आठवड्यावरून सहा ते आठ आठवडे करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन लसींमधील अंतर २८ दिवसांचे असावे असे याआधी ठरविण्यात आले होते. मात्र संशोधनात ‘कोविशिल्ड’च्या दोन लसींमधील अंतर सहा ते आठ आठवडे झाले तरी ही लस तेवढेच संरक्षण देते हे लक्षात आले आहे. मात्र आठ आठवड्यापेक्षा हे अंतर जास्त नसावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायझेशन’ (एनटीएजीआय) आणि ‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-१९’ या तज्ज्ञमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने ‘कोविशिल्ड’च्या बाबतीत नव्या गाईडलाईन जारी केल्या. तसेच या गाईडलाईन्स फक्त ‘कोविशिल्ड’ आहेत. ‘कोव्हॅक्सिन’च दोन डोस अधीप्रमाणे २८ दिवसांच्या अंतरानेच लागणार आहेत.

leave a reply