सरकार संरक्षणदलांसाठी 70 हजार एके-103 रायफल खरेदी करणार

- भारत-रशियामध्ये ‘इमर्जन्सी’ करार

नवी दिल्ली – संरक्षणदलांसाठी 70 हजार अत्याधुनिक एके-103 रायफल खरेदी करण्यासंदर्भात भारताने रशियाबरोबर करार केला आहे. आपत्कालीन शस्त्रखरेदीच्या तरतुदीअंतर्गत गेल्या आठवड्यात हा करार पार पडल्याचे वृत्त आहे. या रायफल्सची खरेदी ही सर्व सशस्त्रदलांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी यातील बहुतांश रायफल या वायुसेनेला पुरविल्या जाणार आहेत. याबरोबर रशियाकडून एके-203 रायफलीच्या खरेदीसंदर्भात लवकरच करार होऊ शकतो, असेही वृत्त आहे.

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यावर दहशतवादी कारवाया पुन्हा वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याआधी पंचवीस वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यावर जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. या पार्श्‍वभूमीवर हा खरेदी करार पार पडत आहे. दहशतवादविरोधी कारवाईत या रायफल्स अतिशय उपयुक्त ठरतील असा दावा केला जात आहे. एकूण 70 हजार एके-103 रायफल्स खरेदी करण्यात येणार असून या रायफल्स संरक्षणदलांकडील जुनाट इन्सास रायफलींची जागा घेतील.

भारतीय लष्कराला सुमारे सात लाख नव्या रायफलींची आवश्‍यकता आहे. तसेच वायुसेना आणि नौदलासाठीही अत्याधुनिक रायफलींची आवश्‍यकता आहे. वायुसेनेला सुमारे दीड अत्याधुनिक ॲसॉल्ट रायफलींची आवश्‍यकता आहे. सरकारने याआधी अमेरिकेकडून 70 हजार सिग रायफली खरेदी केल्या होत्या, तर आणखी 72 हजार सिग रायफली खरेदीसाठी काही महिन्यांपूर्वीच आपत्कालीन खरेदीला मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेकडून मिळाल्या सिग रायफली या गेल्यावर्षी चीन सीमेवर तैनात जवानांना इन्सास राययलींच्या जागी पुरविण्यात आल्या होत्या. तसेच जम्मू-काश्‍मीरमध्ये तैनात जवानांनाही या रायफली देण्यात आल्या होत्या. यासह 16 हजार निगेव्ह लाईट मशिन गन्स (एलएनजी) इस्रायलकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. आता रशियाकडून एके-103 रायफलींची खरेदी केली जात आहे.

भारताने याआधीच रशियाबरोबर एके-203 रायफल खरेदीसंदर्भातही 2018 साली भारत व रशियाबरोबर करार पार पडला होता. यानुसार उत्तर प्रदेशातील प्रकल्प स्थापून तेथेच सात लाख एके-203 या एके श्रेणीतील सर्वात अत्याधुनिक राफयलींचे उत्पादन घेतले जाणार आहे. यासंदर्भात अंतिम करार अजून पार पडलेला नाही. यासंदर्भातील वाटाघाटी पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून रसोबोर्नएक्सपोर्ट या रशियन विभागाबरोबर यासंदर्भात अंतिम करार लवकरच होण्याची शक्यता आहे.

leave a reply