महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या म्हणजे इशारघंटा

उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई – राज्यातील कोरोनाव्हायरसने दगावलेल्यांची संख्या १६ झाली असून या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या ३३५ पर्यंत पोहचली आहे. मंगळवारी राज्यात एका दिवसात ८२ रुग्ण वाढले होते, तर बुधवारी आणखी १५ रुग्ण आढळले. यातील १४ रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यात या साथीच्या रुग्णांशी जवळून संबंध आलेल्या पाच हजारपेक्षा जास्त जणांना वेगळे ठेवण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तर राज्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या इशारघंटा असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. तसेच लॉकडाऊन काळात बेजबाबदारपणे वागून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना यापुढे गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे चिंता वाढल्या आहेत. मुंबईतील रुग्णांची संख्या दोन दिवसात ७४ ने वाढली आहे. मंगळवारी तब्बल ६० नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवारी आणखी १४ रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत आतापर्यंत १८० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईतच नव्हे राज्यातील इतर भागातही या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात ५०, ठाण्यात ३६, सांगलीत २५, नागपुरात १६,अहमदनगर ८, बुलढाणा ४, सातारा आणि कोल्हापुरात प्रत्येकी दोन रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. याशिवाय औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, जळगांव, नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्णांच्या या वाढत्या संख्येने यंत्रणेपुढील आव्हाने वाढवली आहेत. या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवली जात आहे. आतापर्यंत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५ हजार ३४३ जणांना वेगळे काढण्यात आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच त्यांची चाचणी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत १९१ भाग नागरिकांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. या भागांना कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. या साथीचा अधिक फैलावू नये म्हणून खबरदारीचा हा उपाय करण्यात आला आहे.

दरम्यान दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी कित्येकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातूनही सुमारे २५० जण गेले होते. काही दिवसांपूर्वीच राज्यात पुन्हा परतलेल्या या सर्वांचा शोध सुरु आहे. पुण्यात परतलेल्या १८२ पैकी १०६ जणांना शोधून काढण्यात आले आहे. नागपूरमध्ये परतलेल्या ६७ पैकी ५४ जणांपर्यंत पोलीस व इतर यंत्रणा पोहचल्या असून या सर्वाना वेगळे ठेवण्यात आले आहे. याच कार्यक्रमातून अहमदनगरमध्ये परतलेल्या ३४ जणांपैकी २९ जण हे परदेशी नागरिक आहेत.

यामुळे आता यंत्रणांवरील ताण अधिकच वाढला आहे. त्याचवेळी काही जण लॉकडाऊनचे नियम पाळण्यास तयार नाहीत. घरातून बाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्यात या साथीच्या रुग्णांची वाढती संख्या इशारघंटा ठरते. इटली, स्पेन, अमेरिकेकडे पाहून शहाणे व्हा. घरात थांबून कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग द्या, गर्दी करणाऱ्यांमुळे या साथीविरोधातील लढाईला धक्का बसत आहे. हे असेच चालू राहिले तर आणखी कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा उपमुख्यामंत्र्यांनी दिला आहे.

leave a reply