ऑगस्ट महिन्यात 1.12 लाख कोटींचे जीएसटी संकलन

नवी दिल्ली – जीडीपीमधील वाढ आणि प्रमुख क्षेत्रातील उत्पादनवाढीनंतर अर्थव्यवस्था कोरोनाचे सावट बाजूला सारून वेगाने प्रगती करीत असल्याची अधोरेखित करणारी आणखी एक बातमी आली आहे. ऑगस्ट महिन्यात 1.12 लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला मिळाला असून सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी महसूल 1 लाख 10 हजार कोटी रुपयांच्या वर नोंदविला आहे. तर गेल्या अकरा महिन्यातील दहा महिने जीएसटी संकलन हे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे. केवळ जून महिन्यात कर संकलन एक लाख कोटी रुपयांच्या खाली राहिले होते.

देशाच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळाल्याचे संकेत देणाऱ्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत आहेत. आठ प्रमुख पायाभूत क्षेत्राचा विकासदरात जुलै महिन्यात वाढ झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी दिली होती. पोलाद, सिमेंट, नैसर्गिक वायू, कोळसा, इंधन तेल, खत आणि ऊर्जा क्षेत्राचा सरासरी विकासदर हा जुलै महिन्यात 9.4 टक्के इतका नोंदविण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.7 टक्क्यांनी अधिक असून यावर्षीच्या जुन महिन्याच्या तुलनेतही त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात वाढ नोंदविण्यात आली आहे.

त्याचवेळी चालू आर्थिक वर्षाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) विक्रमी वाढ झाल्याचेही मंगळवारी सरकारने जाहीर केले होते. एप्रिल ते जून दरम्यानच्या जीडीपी तब्बल 20.1 टक्के इतका नोंदविण्यात आला होता. ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक तिमाही जीडीपी ठरला होता. याशिवाय औद्योगिक महागाई दरात घट झाल्याचे अर्थमंत्रालयाने सोमवारी जाहीर केले होते.

बुधवारी पीएमआय निर्देशांक म्हणजे उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी निगडीत पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सबाबतही आकडेवारीही जाहीर झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या तुलनेत घट दिसून येत आहे. जुलै महिन्यात पीएमआय निर्देशांक 55.3 टक्के इतका होता. तर ऑगस्टमध्ये हा निर्देशांक 52.3 टक्के नोंदविण्यात आला आहे. उत्पादन क्षेत्रात मागणीच्या आधारावर उत्पादन घेण्यासाठी केली जाणारी कच्च्या मालाची खरेदी, कारखान्यांना मिळालेल्या ऑर्डर आणि उत्पादनाची शक्यता यावर हा निर्देशांक आधारलेला असतो. अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदराचे अंदाज यातून बांधले जातात. 50 टक्क्यांच्या वरील पीएमआय निर्देशांक अर्थव्यवस्थेची गती व स्थिती चांगली असल्याचे दर्शवतो. त्यामुळे जुलैच्या तुलनेत पीएमआय कमी आला असला तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. तसेच कोरोनाच्या संक्रमणात वाढ होऊ लागल्याचे संकेत मिळाल्याने पीएमआय इंडेक्स घसरल्याचा निष्कर्ष मांडण्यात येत आहे.

यामध्ये आता जीएसटी महसूल संकलनाचे आकडेही समोर आले आहेत. तब्बल 1.12 लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल सरकारला ऑगस्ट महिन्यात मिळाला असून जीएसटी संकलनाचा हा वेगही अर्थव्यवस्था प्रगती करत असल्याचे व विविध क्षेत्रात उत्पादन व उलाढाली वाढल्याचे दर्शवत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

ऑगस्ट महिन्यातील जीएसटीमध्ये 20 हजार 522 कोटी रुपये हा केंद्रीय जीएसटी अर्थात सीजीएसटी आहे. तर 26 हजार 605 कोटी रुपये हा राज्यांचा जीएसटी आहे. यशिवाय 56 हजार 246 रुपये हे आयजीएसटी आहे. तेच 8 हजार 646 कोटी रुपये उपकराच्या रुपात मिळाले आहेत. जुलै महिन्यात 1 लाख 16 हजार कोटी रुपयांची जीएसटी संकलन झाले होते.

leave a reply