कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव असतानाही एप्रिल महिन्यात जीएसटी महसूल विक्रमी स्तरावर

नवी दिल्ली – देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत असताना, त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यातील जीएसटी महसूलात झालेली विक्रमी वाढ, देशाचा उत्साह वाढविणारी ठरते. एप्रिल महिन्यातील एकूण जीएसटी १.४१ लाख कोटी रुपयांवर गेल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली. मार्च महिन्याच्या तुलनेत यात १४ टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली आहे. तसेच २०१७ साली जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या विक्रमी प्रमाणात महसूल जमा झाल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.

एप्रिल महिन्यातील जीएसटीची रक्कम एक लाख, ४१ हजार, ३८४ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या सात महिन्यांपासून जीएसटीद्वारे एक लाख कोटी रुपयांहून अधिक प्रमाणात महसूल जमा करण्यात येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत यामुळे मिळाल्याचा दावा उद्योगक्षेत्राकडून केला जातो. मात्र एप्रिल महिन्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजविला होता. या महिन्यात देशातील बर्‍याच ठिकाणी अर्थव्यवहार ठप्प झाले होते. अशा स्थितीतही जीएसटीद्वारे मिळालेली रक्कम उत्साह वाढविणारी तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास अधिकच दृढ करणारी बाब ठरते.

यामुळे देशाच्या उद्योगक्षेत्राला फार मोठा दिलासा मिळत आहे. कोरोनाच्या साथीचा सामना करीत असताना, भारताच्या उद्योगक्षेत्राने पुढाकार घेऊन आवश्यक त्या सोईसुविधा पुरविण्यासाठी झपाट्याने पावले उचलली आहेत. अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याबरोबरच टंचाई भासत असलेल्या ऑक्सिजनची निर्मिती व त्याच्या पुरवठ्यासाठी देशातील अग्रगण्य उद्योगसमुहांनी आवश्यक निर्णय घेतले आहेत. याचे देशभरात स्वागत होत आहे. कोरोनाच्या साथीचा जबरदस्त फटका भारतीय उद्योगक्षेत्राला बसलेला असला, तरी आत्मनिर्भरतेच्या अभियानाला याच काळात मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्याचेही समोर आले आहे.

भारतीय उद्योगक्षेत्र देशावर आलेल्या संकटाच्या काळात आवश्यक ते सहकार्य करीत आहे. या साथीचे आव्हान परतविण्यासाठी उद्योगसमुहांकडून आपल्या स्त्रोतांचा वापर केला जात आहे, ही देशासाठी फार मोठी जमेची बाजू ठरते.

leave a reply