चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी गुजरातच्या भावनगरमध्ये ‘कंटेनर हब’ बनणार

‘कंटेनर हब’नवी दिल्ली – गुजरात भावनगरला देशातील कंटेनर उत्पादनाचा हब बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताला दरवर्षी सुमारे साडे तीन लाख कंटेनरची आवश्यकता भासते. तसेच जगभरात कंटेनरची मागणी वाढली आहे. असे असताना भारतात कंटेनरचे उत्पादन होत नव्हते. यासाठी भारत प्रामुख्याने चीनवर अवलंबून होता. मात्र आता आत्मनिर्भर भारताच्या धोरणांतर्गत चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी देशात भावनगरला कंटेनर निर्मितीचा हब बनविण्यात येणार आहे. यासाठी खाजगी क्षेत्रातूनही मोठी गुंतवणूक अपेक्षित असून जगातील सर्वात मोठी स्टिल उत्पादक कंपनी आर्सेलरमित्तल या कंटेनरच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेच्या पोलादाचा पुरवठा भारताला करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

भारताला मोठा सागरी किनारा लाभला असून गेल्या काही वर्षात जलमार्गाने व्यापार वाढला आहे. भारत सरकारने देशात बंदरांच्या विकासावर भर दिला असून बंदरांमधून होणारी कंटेनर वाहतूक वाढली आहे. यामुळे कंटेनरची मागणीही प्रचंड वाढली आहे. भविष्याचा विचार करून या कंटेनर बांधणीच्या आघाडीवर भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी गुजरातच्या भावनगरला कंटेनर हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय जहाज व जलमार्गमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली.

भावनगरला कंटेनर उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. भावरनगरमध्ये कंटेनर उत्पादन केंद्र उभारण्यासाठी खाजगी क्षेत्रातून १ हजार कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. यातून लाखो रोजगारांची निर्मिती होईल, असा विश्‍वास मंडाविया यांनी व्यक्त केला.

जागतिक पातळीवर कंटेनरचा तुडवडा भासत आहे. कंटेनरची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही भावनगरमध्ये विकसित करण्यात येणारे हे उत्पादन केंद्र महत्त्वाचे ठरेल. भारताला ३.५ लाख कंटेनरची गरज असते. आतापर्यंत भारतात कंटेनरचे उत्पादन होत नव्हते. कंटनेर निर्मित क्षेत्रात चीन ग्लोबल लिडर आहे. भारतालाही चीनवरच यासाठी अवलंबून रहावे लागते. मात्र भारतात कंटेनर उत्पादन केंद्र बनल्याने चीनवरील ही निर्भरता कमी होईल.

प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी १० जागांची निवड करण्यात आली होती. भावनगरमध्ये कंटेनरचे उत्पादन सुरू करण्यासाठी गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी री-रोलिंग आणि फर्नेस निर्मात्यांना प्रोत्साहीत करण्यात आले.

सध्या एका कंटनेरसाठी भारताला किंमत ३.५ लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. देशात या कंटेनरचे उत्पादन झाल्यास कंटेनरच्या किंमतीही कमी होतील व ते आयात करण्याची आवश्यकता उरणार नाही. तसेच येत्या काळात भारत कंटनेरची निर्यात करू शकेल. देशातील कंटेनर उत्पादनाकडे लक्ष देण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे मंडाविया म्हणाले.

देशात कंटेनर उत्पादनास सुरुवात केल्यानंतर शिपिंग उद्योगाकडून त्याची खरेदी करण्यात येईल. या संदर्भात शिपिंग उद्योगाबरोबर बैठक पार पडली आहे. कंटेनर तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठी स्टील उद्योगाबरोबर देखील चर्चा करण्यात येत असल्याची माहिती मंडाविया यांनी दिली. आर्सेलरमित्तल या जगातील सर्वात मोठ्या पोलाद उत्पादक कंपनीने भारताला यासाठी आवश्यक गुणवत्तेचे पोलाद पुरविठ्याचे आश्‍वासन दिले आहे, असे मंडाविया म्हणाले.

leave a reply