आखाती देशांनी अण्वस्त्रसज्ज इराणविरोधात सज्ज रहावे

- सौदीचे प्रिन्स तुर्की अल फैझल

अण्वस्त्रसज्जमनामा – ‘आखाती देशांच्या सुरक्षेला इराणपासून खरा धोका आहे. अशा या इराणबरोबर अणुकरार झाल्यास या क्षेत्रातील समस्या सुटणार नाहीत. उलट इराणच्या नेतृत्वामुळे या क्षेत्रात संघर्ष पेट घेईल. म्हणूनच आखाती देशांनी अण्वस्त्रसज्ज इराणच्या विरोधात सज्ज व्हावे’, असे आवाहन सौदी अरेबियाचे प्रिन्स तुर्की अल-फैझल यांनी केले आहे. प्रिन्स तुर्की हे काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील सौदीचे राजदूत होते. अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे चर्चा सुरू असताना सौदी राजघराण्याच्या या प्रभावी सदस्यांनी अरब देशांना केलेले आवाहन महत्त्वाचे ठरते.

बाहरिनची राजधानी मनामा येथे अल-बिलाद फोरमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आखाती-अरब देशांतील राजकीय नेते, राजनैतिक अधिकारी तसेच इतर क्षेत्रातील किमान ६० सदस्यांनी सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात प्रिन्स तुर्की यांनी आखाती क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. सामरिक, आर्थिक आणि व्यापारी प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून या क्षेत्राला महत्त्व दिले जात असल्याचे प्रिन्स तुर्की म्हणाले.

‘पण येत्या काळातही अशीच परिस्थिती असेल का, हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्यातील मतभेद आणि उणीवा दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. याने आपल्याला सर्व आव्हानांचा यशस्वीरित्या सामना करता येईल. अगदी अण्वस्त्रसज्ज इराणच्या विरोधातही आखाती देशांनी सज्जता ठेवली पाहिजे’, असे प्रिन्स तुर्की यांनी स्पष्ट केले.

अण्वस्त्रसज्जइराणबरोबरचा अणुकरार पुनरूज्जीवित करण्यासाठी अमेरिकेने चर्चा सुरू केलेली असताना प्रिन्स तुर्की यांनी इराणपासून असलेल्या धोक्याची आठवण करुन दिली. इराणपासून आखाती देशांच्या सुरक्षेला असलेला धोका वास्तववादी आहे. तेव्हा अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार करून या क्षेत्रातील समस्या सुटणार्‍या नाहीत. कारण या अणुकरारानंतर इराणच्या नेतृत्वामुळे या क्षेत्रात संघर्ष पेटेल, असे प्रिन्स तुर्की यांनी बजावले.

विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून आखाती क्षेत्र मुक्त ठेवण्यासाठी सौदी व या क्षेत्रातील अरब देश प्रतिबद्ध आहेत. पण त्याचबरोबर आखाती देशांनी अण्वस्त्रसज्ज इराणच्या विरोधातही आपली सज्जता ठेवावी, असे प्रिन्स तुर्की यांनी यावेळी सुचविले. इराणपासून असलेला धोका या देशाच्या अण्वस्त्रसज्जतेपर्यंत मर्यादित नाही. तर इराणची क्षेपणास्त्रे, गेल्या चार दशकांमध्ये इराणने अरब-आखाती क्षेत्रात वाढविलेला हस्तक्षेप, येथील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने संबंधित देशांच्या समाजव्यवस्था मोडून काढण्याचा इराणचा प्रयत्न देखील तितकाच धोकादायक असल्याचे प्रिन्स तुर्की यांनी सांगितले.

तर इराणच्या अण्वस्त्रांपासून असलेल्या धोक्यावर चर्चा करीत असताना, इराणवर घट्ट पकड असलेल्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचेही प्रिन्स तुर्की म्हणाले. येत्या काळात इराणचे नेतृत्वाकडे अण्वस्त्रसज्ज झालाच तर त्यावेळी या क्षेत्रातील स्थिरता कायम राखण्यासाठी आखाती देश इतर पर्यायांचा विचार करीत असल्याचे प्रिन्स तुर्की म्हणाले. पण या पर्यायावर प्रिन्स तुर्की यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

उल्लेख केला नसला तरी, युएई व बाहरिनसारख्या देशांनी इस्रायलबरोबर सुरू केलेले सहकार्य आणि सौदी-युएईने अणुऊर्जेसाठी सुरू केलेल्या प्रयत्न, याकडे प्रिन्स तुर्की लक्ष वेधत असल्याचे दिसत आहे.

leave a reply