नायजेरियातील हिंसाचारात 53 जणांचा बळी

गुसाऊ – नायजेरियाच्या वायव्येकडील झम्फारा प्रांतात झालेल्या हल्ल्यांमध्ये 53 जणांचा बळी गेला. बळींमध्ये शेतकरी आणि गुराख्यांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. झम्फारा प्रांतातील वाढता हिंसाचार या भागात भयंकर आपत्ती निर्माण करील, असा इशारा आंतरराष्ट्रीय संघटनेने आठवड्यापूर्वीच दिला होता. या प्रांताची अर्थव्यवस्था शेती आणि सोन्याच्या खाणींवर अवलंबून आहे.

नायजेरियातील हिंसाचारात 53 जणांचा बळीनायजेरियातील अस्थिर प्रांतांपैकी एक असळेल्या झम्फारामध्ये गेल्या आठवड्यात मोठे हल्ले झाले. मोटारीवरुन आलेल्या बंदूकधार्‍यांनी झुर्नी जिल्ह्यातील येथील कादावा, क्वाता, मदूबा, गांदा सामू, सौलावा आणि अस्कावा या गावांवर हल्ले चढविले. गावातील रहिवाशी, शेतात काम करणारे शेतकरी तसेच या हल्ल्यांपासून पळणार्‍यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. झम्फाराच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसात 53 गावकर्‍यांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेनंतर या भागात जवानांना तैनात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

झम्फारामधील या हिंसाचारात 60 ते 90 जणांचा बळी गेल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. पण पोलिसांनी सदर वृत्त फेटाळले असून बळींची संख्या 60 हून अधिक नसल्याचे म्हटले आहे. हे सारे हल्लेखोर झुर्नीच्या जंगलात दडलेले असतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ठराविक दिवसानंतर गावकर्‍यांवर हल्ले चढविणार्‍या, संपत्ती लुटणार्‍या आणि गुराढोरांची चोरी करणार्‍या हल्लेखोरांवर कारवाई करावी, यासाठी झुर्नी जिल्ह्यातील गावकर्‍यांनी काही दिवसांपूर्वी येथील महामार्ग रोखला होता. पण स्थानिक पोलिसांनी झुर्नीच्या जंगलात दडलेल्या हल्लेखोरांवर कारवाई केलेली नाही.नायजेरियातील हिंसाचारात 53 जणांचा बळी

चार दिवसांपूर्वी झम्फारा येथील मालेले आणि रांडा गावांवर हल्ला चढवून हल्लेखोरांनी किमान 60 महिलांचे अपहरण केले होते. तर फेब्रुवारी महिन्यात याच प्रांतातील झांगेबी येथील शाळेतून सुमारे 300 विद्यार्थीनींचे तर त्याआधी विद्यार्थ्यांचे अपहरण केले होते. बहुतांशवेळा हल्लेखोर खंडणीसाठी हे अपहरण करीत असल्याचा दावा केला जातो. पण हल्लेखोरांचे वाढते हल्ले आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची अकार्यक्षमता यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. झम्फारामधील नागरिक नायजेरियाची सीमा ओलांडून नायजरमध्ये स्थलांतरीत होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. नायजेरियातील हिंसाचारात 53 जणांचा बळीअशीच परिस्थिती राहिली तर झम्फारामध्ये मानवीसंकट निर्माण होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय संघटनेने गेल्या आठवड्यात दिला होता.

झम्फारासह नायजेरियाच्या इतर प्रांतांमध्ये अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी संघटनांबरोबर छोट्यामोठ्या स्थानिक टोळ्या आहेत. यामध्ये गुरढोरांची लूट करणार्‍या टोळ्यांचा देखील समावेश आहे. नायजेरियाचे सरकार दहशतवादी संघटना तसेच स्थानिक टोळ्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जातो. काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी देखील नायजेरियाच्या राष्ट्रप्रमुखांवर टीका केली होती.

दरम्यान, झम्फारा प्रांताची अर्थव्यवस्था शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला जातो.

leave a reply