पाकिस्तानच्या ग्वादरमधील घातपाताचा कट इराणमध्ये शिजला

- पाकिस्तानचा इराणवर गंभीर आरोप

कराची/इस्लामाबाद – पाकिस्तानातील दहशतवादाला भारत जबाबदार असल्याचे आरोप करणार्‍या पाकिस्तानने आता आपल्या देशातील घातपाताचे खापर इराणवरही फोडण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात ग्वादरमध्ये झालेल्या चीनच्या इंजिनिअर्सवरील दहशतवादी हल्ल्याचा कट इराणमध्ये आखण्यात आला व याचे सूत्रधारही इराणमध्येच असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानच्या ग्वादरमधील घातपाताचा कट इराणमध्ये शिजला - पाकिस्तानचा इराणवर गंभीर आरोपगेल्या महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदराजवळ मोठा आत्मघाती स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा बळी गेला तर डझनहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. ग्वादर बंदरातील चिनी इंजिनिअर्सच्या मोटारीला आत्मघाती हल्लेखोराने लक्ष केले होते. या स्फोटात आपले इंजिनिअर्स जखमी झाल्यानंतर चीनने पाकिस्तानला धारेवर धरले होते. अवघ्या महिन्याभरात पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला होता.

चीनने फटकारल्यानंतर पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी ग्वादर स्फोटामागे भारत असल्याचा आरोप केला होता. या बिनबुडाच्या आरोपांची पाकिस्तानातील काही पत्रकारांनी खिल्ली उडविली होती. तर चीनने पाकिस्तानला देशांतर्गत दहशतवादाचा बंदोबस्त करण्याची आणि आपल्या इंजिनिअर्सची सुरक्षा वाढविण्याची सूचना केली होती. अपुर्‍या सुरक्षाव्यवस्थेमुळे गेले महिनाभर ग्वादरमधील चीनचे प्रकल्प रखडले आहेत.

दरम्यान, बलोचिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने ग्वादर हल्ल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले. यापैकी एका आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती स्फोट घडविणारा दहशतवादी इराणमधून पाकिस्तानात दाखल झाला होता. तर या स्फोटाचा सूत्रधार रसुल बक्श असून तो इराणच्या शिरन छाबहार भागात असल्याचे पाकिस्तानी यंत्रणांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या या आरोपांवर इराणने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून इराण व पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. इराणमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानचे लष्कर जबाबदार असल्याची टीका इराण करीत आहे. गेल्या आठवड्यात इराण-पाकिस्तान सीमेवर दोन्ही देशांचे जवान हुज्जत घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

पाकिस्तानच्या ग्वादरमधील घातपाताचा कट इराणमध्ये शिजला - पाकिस्तानचा इराणवर गंभीर आरोपबलोचिस्तानमधील स्वातंत्र्याची चळवळ दडपण्यासाठी चीनने पाकिस्तानला सहा महिन्यांची मुदत दिल्याची कबुली पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने काही महिन्यांपूर्वी दिली होती. पुढच्या काळात बलोचींवरील कारवाईसाठी पाकिस्तानचे लष्कर इराणमध्ये घुसेल. ‘सीपीईसी’विरोधात कारस्थाने आखणार्‍या इराणला धडा शिकविण्यासाठी चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पैसे पुरविल्याचे सदर पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याने म्हटले होते. बांगलादेशी वर्तमानपत्राने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती.

इराण व पाकिस्तानमधील मतभेद तीव्र बनत चालल्याचे गेल्या काही महिन्यांपासून समोर येऊ लागले आहे. अफगाणिस्तानचा ताबा घेणार्‍या तालिबानने पाकिस्तानच्या नादी लागू नये, त्याऐवजी भारत, इराण व रशियाशी सहकार्य करावे असा सल्ला इराणच्या राजवटीशी संलग्न असलेल्या एका वर्तमानपत्राने दिला होता. तर पाकिस्तान आपल्या देशातील दहशतवादामागे इराण असल्याचे आरोप करू लागला आहे. तसेच इराण पाकिस्तानच्या विरोधात भारताला साथ देत असल्याचे आरोप पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत. आता तर पाकिस्तानच्या यंत्रणा उघडपणे इराणवर दहशतवादाचे आरोप करू लागल्या आहेत. यावर इराणकडून जहाल प्रतिक्रिया उमटू शकते.

leave a reply