हमास, हिजबुल्लाहने गेल्या वर्षीच इस्रायलवर हल्ल्याचा कट आखला होता

- लेबेनीज वर्तमानपत्राचा दावा

बैरूत/तेहरान – गेल्या वर्षीच इस्रायलवर भीषण हल्ले चढविण्याची योजना हमास आणि हिजबुल्लाहने आखली होती. हमासचा प्रमुख इस्माईल हनिया आणि हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला यांनी याची तयारी केलेली होती, असा दावा लेबेनीज वर्तमानपत्राने केला आहे. इस्रायल व हमासमध्ये 11 दिवसांचा संघर्ष सुरू असताना, हमास-हिजबुल्लाहच्या नेत्यांचा समावेश असलेले इराणच्या लष्कराचे ‘वॉर रूम’ लेबेनॉनमध्ये उभारण्यात आले होते. याद्वारे इस्रायलच्या प्रत्येक हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जात होता, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

हमास, हिजबुल्लाहने गेल्या वर्षीच इस्रायलवर हल्ल्याचा कट आखला होता - लेबेनीज वर्तमानपत्राचा दावाकतारमध्ये आश्रय घेतलेला हमासचा नेता इस्माईल हनिया याने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लेबेनॉनमधील अज्ञात ठिकाणी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला याची भेट घेतली होती. हिजबुल्लाहच्या कार्यालयाने या भेटीचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. याच भेटीत हनिया आणि नसरल्लाहने इस्रायलवर हल्ले चढविण्याचा कट आखला होता. यासाठी 2006 साली हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात केलेल्या संघर्षातलेच डावपेच वापरण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये ठरले होते, अशी बातमी ‘अल-अखबार’ या हिजबुल्लाह संलग्न लेबेनीज वर्तमानपत्राने दिली.

इस्रायलच्या लढाऊ विमानांना गुंगारा देण्यासाठी फसवे रॉकेट लाँचर्सचे तळ उभारण्याचे या भेटीत ठरले होते. येमेनमधील हौथी या इराणसंलग्न बंडखोर संघटनेच्या प्रमुखाने हनियाशी संपर्क साधला होता. इस्रायलवरील या हल्ल्याच्या योजनेत आपल्यालाही सहभागी करून घ्यावे आणि इस्रायलच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ले चढवावे, याची माहिती आपल्याला द्यावी, अशी मागणी हौथीच्या प्रमुखाने केली होती. पण इस्रायलचे लष्कर जोपर्यंत मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, तोपर्यंत हौथींनी या संघर्षात सहभागी होऊ नये, असे हनियाने कळविले होते, असा दावा हिजबुल्लाह संलग्न वर्तमानपत्राने केला.हमास, हिजबुल्लाहने गेल्या वर्षीच इस्रायलवर हल्ल्याचा कट आखला होता - लेबेनीज वर्तमानपत्राचा दावा

गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमास यांच्यात 11 दिवसांचा संघर्ष सुरू असताना, इस्रायलच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी व हमासपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये ‘वॉर रूम’ उभारण्यात आले होते. यामध्ये हमास, हिजबुल्लाहच्या नेत्यांबरोबर इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चे वरिष्ठ अधिकारी देखील हजर होते. इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल इस्माईल कानी यांनी दोन वेळा या वॉर रूमला भेट दिली होती, असा दावा केला जातो.

दरम्यान, हमास, हिजबुल्लाह या दोन्ही दहशतवादी संघटना आहेत. यांना इराणचा राजकीय, आर्थिक व लष्करी पाठिंबा आहे. या संघटनांच्या सहाय्याने इराण आपल्या देशावर सर्व बाजूने हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. हिजबुल्लाहसंलग्न वर्तमानपत्राने सदर बातमी प्रसिद्ध करून इस्रायलच्या आरोपांना बळ दिले आहे.

leave a reply