हमास पुन्हा एकदा इस्रायलच्या शहरांवर रॉकेटचा वर्षाव करील

- हिजबुल्लाहसंलग्न लेबेनीज वर्तमानपत्राचा इशारा

बैरूत – इस्रायलने पॅलेस्टिनींच्या भावना दुखावल्या तर इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करणार्‍या रॉकेट्सचा पुन्हा वर्षाव करू, अशी धमकी हमासने दिली आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहशी संलग्न असलेल्या वर्तमानपत्राने हमासची ही धमकी प्रसिद्ध केली. 11 दिवसाच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी झालेली आहे खरी. पण ही संघर्षबंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. कुठल्याही क्षणी इथे संघर्ष पेट घेऊ शकतो, असे इशारे हमास तसेच इस्रायलकडून सातत्याने दिले जात आहेत.

हमास पुन्हा एकदा इस्रायलच्या शहरांवर रॉकेटचा वर्षाव करील - हिजबुल्लाहसंलग्न लेबेनीज वर्तमानपत्राचा इशारा1967 साली इस्रायल आणि शेजारच्या देशांबरोबर सहा दिवसांचे युद्ध पेटले होते. या युद्धात विजयी झालेल्या इस्रायलने जेरूसलेमला आपल्या देशात जोडून टाकले होते. याची आठवण म्हणून दरवर्षी 10 मे रोजी इस्रायलमध्ये विजयी मिरवणूक काढून हा विजयदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे गेल्या महिन्यात यानिमित्ताने मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. पण हमासने गाझापट्टीतून रॉकेट्सचा वर्षाव केल्यानंतर इस्रायल सरकारला सदर मिरवणूक पुढे ढकलावी लागली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव सलग दोन वेळा ही मिरवणूक पुढे ढकलल्यानंतर गेल्या आठवड्यात स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी या मिरवणुकीला परवानगी दिली. त्यानुसार मंगळवारी 15 जून रोजी जेरूसलेममधून ही मिरवणूक निघणार आहे. पण इस्रायलच्या सरकारने मंजुरी दिलेली ही मिरवणूक पॅलेस्टिनींच्या भावना दुखावणारी असल्याचा आरोप हमासने केला आहे. इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अब्बास केमाल यांच्यामार्फत हमासच्या नेत्यांनी यासंबंधीची धमकी इस्रायलपर्यंत पोहचविली, अशी माहिती हिजबुल्लाहसंलग्न वर्तमानपत्राने दिली.हमास पुन्हा एकदा इस्रायलच्या शहरांवर रॉकेटचा वर्षाव करील - हिजबुल्लाहसंलग्न लेबेनीज वर्तमानपत्राचा इशारा

आपल्या इशार्‍यानंतरही जेरूसलेममध्ये मिरवणूक काढण्यात आली तर 10 मे प्रमाणे इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव केला जाईल, असे हमासच्या नेत्यांनी इस्रायलला बजावले आहे. तर हमासचा वरिष्ठ नेता महमूद अल-जहर याने गाझातील हमासच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीतही इस्रायलला धमकावले. यापुढे इस्रायलवर अधिक भीषण हल्ले चढविले जातील, असा इशारा अल-जहर याने दिला. तर काही तासांपूर्वी हमासचा आणखी एक नेता मुसे अबू-मरझोक याने देखील इस्रायलच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा पर्याय अजूनही समोर असल्याचे जाहीर केले.

संघर्षबंदीच्या काळात आपण नव्याने शस्त्रसज्ज झाल्याच्या घोषणा हमासने केल्या. संघर्षबंदीबाबत इस्रायलसह लिखित करार झाला नसून आपली बोटे आजही रॉकेट्सच्या ट्रिगरवर असल्याचे हमासने संघर्षबंदीनंतर जाहीर केले होते. तर हिजबुल्लाहने देखील यापुढील इस्रायलविरोधी संघर्षात आपण सहभागी होणार असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply