अफगाणिस्तानातून १८० हिंदू,शीख निर्वासित आश्रयासाठी भारतात येणार

काबूल – गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातील ११ शीख निर्वासितांची पहिली बॅच भारतात दाखल झाली होती. आता आणखी काही अफगाणी हिंदू आणि शीख निर्वासित भारतात परतत आहेत. भारतात आश्रयासाठी येणाऱ्या या दुसऱ्या बॅचमध्ये १८० जण असल्याची माहिती समोर येत आहे . मार्च महिन्यात काबूलमध्ये शीख समुदायाला लक्ष्य करून तालिबानने घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात २५ जणांचा बळी गेला होता. यानंतर तालिबानचे दहशतवादी हल्ले, अत्याचाराला बळी ठरणाऱ्या अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख धर्मियांना भारतात आश्रय द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदू आणि शीख धर्मीयांना भारतात आश्रय दिला जाईल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले होते.

अफगाणिस्तानातून १८० हिंदू,शीख निर्वासित आश्रयासाठी भारतात येणारअफगाणिस्तानात हिंदू आणि शीख धर्मियांवरील हल्ले वाढले आहेत. वाढता दहशतवाद, हिंसाचार आणि भेदभाव या कारणांमुळे तेथील अल्पसंख्यांक भारतात येत आहेत. अफगाणिस्तानातील या अल्पसंख्यांक समुदायाला भारतात आश्रय देण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्यावर्षी संसदेत शेजारी देशांतील हिंदू, शीख,बौद्ध, पारशी, ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायाला भारतीय नागरिकत्व देणारा ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ (सीएए) मंजूर झाला होता. याच कायद्यातर्गत भारतात आश्रयासाठी येणाऱ्या अफगाणिस्तानातील या हिंदू आणि शीख समुदायाच्या नागरिकांना पुढील काळात नागरिकत्व मिळू शकते, असे सांगितले जात आहे. सध्या अफगाणिस्तानातील या हिंदू आणि शीख निर्वासितांना भारतात येण्यासाठी लघु मुदतीचा व्हिसा देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातून शीख समुदायाचे ११ जण भारतात दाखल झाले. यात निदान सिंग सचदेव यांचा समावेश होता. सचदेव यांचे दोन महिन्यांपूर्वी तालिबानने अपहरण केले होते आणि त्यानंतर त्यांना महिनाभर अन्वयीत अत्याचार सहन करावे लागले होते. तालिबानने त्यांची सुटका केल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांसह भारतात दाखल झाले होते.

दरम्यान, १९८० साली अफगाणिस्तानात हिंदू आणि शीखधर्मियांची संख्या अडीच लाखांवर होती. आता अफगाणिस्तानात केवळ १,३५० हिंदू आणि शीखधर्मिय शिल्लक राहिले आहेत. त्यांनाही अफगाणिस्तानातल्या सततच्या हिंसाचारात असुरक्षित वाटत आहे आणि ते भारतात आश्रयासाठी येत आहेत.

leave a reply