अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख धर्मियांना भारतात आश्रय मिळणार

- परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख धर्मियांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातून भारतात येऊ इच्छिणाऱ्या तेथील अल्पसंख्यांक हिंदू आणि शीखधर्मिय नागरिकांना व्हिसा दिला जाईल. त्यांना सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, असे भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले. भारताच्या या निर्णयाचे अमेरिकन काँग्रेस प्रतिनिधींनी स्वागत केले आहे.

Afghanistan-Indiaगेल्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख धर्मिंयावर होणारे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, येथील काहींनी भारताकडे आश्रय मागितला होता, असे अनुराग श्रीवास्तव म्हणाले. त्यांच्या मागणीचा विचार करुन भारताने त्यांना व्हिसा देण्याचे जाहीर केले. काबूलमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी संबंधितांची कागदपत्रे तपासून कायद्यानुसार त्यांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. तसेच थेट उल्लेख न करता श्रीवास्तव यांनी या हल्ल्यांप्रकरणी पाकिस्तानवर ताशेरे ओढले.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीखधर्मियांचे नेते निदान सिंग सचदेव यांचे अफगाणिस्तानातून अपहरण झाले होते. यावर भारताने चिंता व्यक्त केली होती. नुकतीच सचदेव यांची सुटका झाली. त्याआधी मार्च महिन्यात अफगाणिस्तानात शीख धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ जणांचा बळी गेला होता. यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधींनी भारताने अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख निर्वासितांना आश्रय देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे त्यांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण होईल, असे कॉस्टा म्हणाले. एप्रिल महिन्यात कॉस्टा यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांना पत्र लिहून अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकाना अमेरिकत आश्रय देण्याविषयी विचार करावा, असे म्हटले होते. आता भारताने उचलेल्या या पावलांचे त्यांनी स्वागत केले.

leave a reply