हौथी बंडखोरांचे सौदीच्या इंधनप्रकल्पांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे जोरदार हल्ले

- हल्ले उधळल्याचा सौदीचा दावा

सना/दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरांचे सौदी अरेबियावरील हल्ले तीव्र होऊ लागले आहेत. सौदीच्या एकूण चार शहरांवर हौथींनी १६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचे हल्ले चढविले. या हल्ल्यात दोन मुले जखमी झाली असून १४ घरांचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. तर इराणसमर्थक हौथींचे बहुतांश हल्ले उधळल्याचे सौदीने जाहीर केले. यानंतर सौदीच्या हवाईदलाने हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन व्यापारात आघाडीवर असलेल्या सौदी अरेबियाच्या अराम्कोच्या प्रकल्पांना हौथींनी लक्ष्य केले. सौदीच्या पूर्वेकडील डम्माम प्रांतातील रास तनूरा येथील प्रकल्प तसेच लष्करी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि आठ ड्रोन्सचे हल्ले चढविले. तर सौदीच्या दक्षिण आणि नैऋत्येकडील जेद्दा, जझान आणि नजरान या शहरांमधील इंधन प्रकल्पांवरही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे हल्ले चढविल्याची माहिती हौथीचा प्रवक्ता याह्या सारिया याने दिली. येमेन आणि हौथी बंडखोरांवर आक्रमण करणार्‍या सौदीला धडा शिकविण्यासाठी ही कारवाई केल्याचे सारिया याने म्हटले आहे.

तर हौथी बंडखोरांचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचे हल्ले यशस्वीरित्या भेदल्याची घोषणा सौदीच्या लष्कराने केली. या कारवाईत बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे तुकडे कोसळून डम्माम प्रांतात झालेल्या दुर्घटनेत दोन मुले जखमी झाली. तर जवळपास १४ घरांचे नुकसान झाल्याचे सौदीच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी सांगितले. तसेच ‘हौथींचे हे हल्ले क्रौर्य आणि बेजबाबदारीचे प्रदर्शन करणारे आहेत. आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी यापुढे सौदी आवश्यक ती पावले उचलील’, असे मलिकी पुढे म्हणाले.

रविवारी उशीरा सौदीच्या हवाईदलाने मध्य येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे वृत्त आले होते. पण सौदी, येमेनचे सरकार किंवा हौथी बंडखोरांनी याला दुजोरा दिलेला नाही. पण सौदीच्या पूर्वेकडील शहरांवर हल्ले चढविण्यासाठी १३०० किलोमीटर अंतरावर मारा करणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हौथींकडे असल्याचे नव्याने उघड झाले आहे. या क्षमतेची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान आणि साहित्य हौथींकडे नाही. याचा दाखला देऊन इराणने हौथी बंडखोरांना शस्त्रसज्ज केल्याचा आरोप सौदीने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच हौथी बंडखोरांनी सौदीच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ले चढविले होते. यामध्ये काही विमानांचे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळीही सौदीने हौथी बंडखोरांचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले भेदल्यामुळे मोठे नुकसान टळल्याचा दावा केला होता.

दरम्यान, सौदीच्या इंधनप्रकल्पांवर बॅलेस्टिक आणि ड्रोन्सचे हल्ले चढविणार्‍या हौथी बंडखोरांवर युएई तसेच कतारने टीका केली. ‘इंधन प्रकल्पांबरोबर सामान्य जनतेची सुरक्षा धोक्यात टाकणारे हौथी बंडखोरांचे हे हल्ले म्हणजे घातपाती कृत्य ठरते. यामुळे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन झाले आहे’, असे ताशेरे कतारने ओढले आहेत.

leave a reply