तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय दिला तर पुन्हा हल्ले चढवू

- नाटोच्या प्रमुखांचा इशारा

दहशतवाद्यांना आश्रयब्रुसेल्स – ‘आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाय न रोवू देण्याची जबाबदारी या देशाची सत्ता हाती घेणाऱ्यांवरच असेल. ही जबाबदारी पार पाडण्यात अपयश आले तर या दहशतवाद्यांवर थेट हल्ले चढविण्याची क्षमता, तयारी आणि योजना नाटोचे सदस्य देश व त्यांच्या सहकाऱ्यांकडे तयार आहे’, असा सज्जाड इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी दिला. तालिबान अजूनही अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, नाटोच्या प्रमुखांनी हा इशारा दिला आहे.

तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबुलचा ताबा घेऊन चार दिवस उलटले असून तालिबान आपली प्रतिमा बदलल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण तालिबानमध्ये अजिबात बदल झाला नसल्याचा आरोप अफगाणी जनता, आंतरराष्ट्रीय नेते, विश्‍लेषक करीत आहेत. जगभरात घातपात माजविणाऱ्या अल कायदाच्या नेतृत्वाबरोबर तालिबानचे अजूनही दहशतवाद्यांना आश्रयसंबंध असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने काही दिवसांपूर्वी आपल्या अहवालात केला होता.

तसेच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांबरोबरही तालिबानचे सहकार्य असल्याचे पुरावे समोर आले होते. तर काही दिवसांपूर्वी तालिबानने बगराम हवाईतळावरील तुरुंगातून शेकडो दहशतवाद्यांची सुटका केली होती. या पार्श्‍वभूमीवर, नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी तालिबानला बजावले आहे. तालिबान व तालिबानशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी नाटोसदस्य देश व सहकाऱ्यांवर हल्ले चढविण्याची योजना आखल्याचे आढळले तर तालिबान व संबंधित दहशतवादी संघटनांवर हल्ले चढविले जातील, असा इशारा स्टोल्टनबर्ग यांनी दिला.

दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यामुळे अमेरिकेवरील अल कायदाच्या हल्ल्यांचाधोका वाढल्याची चिंता अमेरिकेचे नेते व्यक्त करीत आहेत. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी देखील अल कायदा व आयएस या संघटना अफगाणिस्तानात अधिक मजबूत होतील, असे बजावले होते.

leave a reply