भारताच्या अध्यक्षपदाखाली सुरक्षा परिषदेत महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या

- राजदूत तिरूमुर्ती यांचा दावा

संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या अध्यक्षपदाचा कालवधी संपुष्टात आला आहे. ‘या एका महिन्याच्या कालावधीत अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर भारताला यश मिळाले. यात अफगाणिस्तानचाही मुद्दा होता’, असे राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूतांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या कारवायांवर गंभीर चिंता व्यक्त करून हा मुद्दा भारताने सुरक्षा परिषदेत उपस्थित केला होता. चीन व रशिया हे देश यावेळी अनुपस्थित राहिले होते. तरीही मुद्यावर भारताला यश मिळाल्याचे दिसत आहे.

अफगाणिस्तानची सत्ता तालिबान हस्तगत करीत असताना, भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानवर होता. याचा लाभ घेऊन भारताने अफगाणी जनतेच्या सुरक्षा व अफगाणिस्तानच्या स्थैर्याचा मुद्दा सुरक्षा परिषदेत मांडला. याच्या बरोबरीने दहशतवाद तसेच सागरी सुरक्षेच्या मुद्यावर भारताने चर्चा आयोजित केली होती. यामुळे पाकिस्तान व चीन अस्वस्थ झाले होते. तर अमेरिका व इतर देशांनी भारताने यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले.

थेट नामोल्लेख टाळून भारताने दहशतवादाच्या पुरस्कर्त्या देशांवर कठोर कारवाईची मागणी उचलून धरली. याला प्रतिसादही मिळाला होता. या साऱ्या गोष्टींचा दाखला देऊन संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्ती यांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत बरेच काही साध्य झाले, असे म्हटले आहे. दरम्यान, ‘लश्‍कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा वापर करून दहशतवाद माजविण्याचा धोकाही भारताने सुरक्षा परिषदेत मांडला होता.

यावरील चर्चेला चीन व रशिया हे देश अनुपस्थित राहिले. या आघाडीवर चीनचे असहकार्य अपेक्षितच होते. पण रशियासारख्या मित्रदेशाने भारताला या मुद्यावर साथ दिली नाही, ही लक्षणीय बाब ठरते, असे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. पण सध्या अफगाणिस्तानातील आपले हितसंबंध जपण्यासाठी रशियाला पाकिस्तानचे सहकार्य आवश्‍यक वाटत आहे. यासाठी रशिया पाकिस्तानबरोबरील संबंध वाढवित असल्याचे दावे केले जातात. म्हणूनच भारत व रशियाच्या संबंधांवर याचा विशेष परिणाम होणार नाही, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या अध्यक्षपदाचा वापर भारताने पाकिस्तानच्या विरोधात केला. अफगाणिस्तानबाबतच्या चर्चेत तर भारताने पाकिस्तानला सहभागी देखील होऊ दिले नाही, अशी तक्रार पाकिस्तानकडून केली जाते. याचा फार मोठा विपरित परिणाम पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर झाला, अशी खंत पाकिस्तानची माध्यमे व्यक्त करीत आहेत.

leave a reply