केरळ, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीने चिंता वाढल्या

-केंद्रीय गृहसचिवांकडून परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली – सलग दुसऱ्या दिवशी केरळामध्ये चोवीस तासात 30 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. तसेच महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पाच हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात आढळलेल्या 46 हजार नव्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण या दोन राज्यात सापडले असून सर्वाधिक मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. कोरोनाच््या पहिल्या दोन्ही लाटांना केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यातूनच सुरूवात झाली होती. यामुळे चिंता वाढल्या आहेत. यामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी केंद्रीय गृहसचिवांनी या दोन्ही राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना रुग्ण आढळत असलेल्या भागांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन बनविण्याची व रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचना केली आहे.

केरळ, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीने चिंता वाढल्या -केंद्रीय गृहसचिवांकडून परिस्थितीचा आढावा
दोन्ही राज्यांना जास्त रुग्ण असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लावण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नसून पुढील दोन महिने महत्त्वाचे असल्याचा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे.

देशभरात चोवीस तासात आढळत असलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 25 हजारापर्यंत खाली आली होती. मात्र गुरुवारी त्यामध्ये मोठी वाढ दिसून आली. कोरोनाच्या नव्या रुग्णांची ही दैनंदिन संख्या 46 हजारांच्या पुढे गेली. तसेच 600 हून अधिक मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये 200 हून अधिक बळी महाराष्ट्रातील आहेत. चोवीस तासात देशभरात आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये 30 हजारपेक्षा जास्त रुग्ण केरळातील, पाच हजार नवे रुग्ण महाराष्ट्रातील होती. गुरुवारी संध्याकाळी या राज्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सलग दुसऱ्या दिवशी या राज्यांमध्ये रुग्ण अनुक्रमे 30 हजार आणि 5 हजारांपेक्षा अधिक नोंदविले गेले आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारी 156 जण कोरोनामुळे दगावले. केरळात 162 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांबाबत चिंता वाढल्या आहेत. केरळात नुकतेच ओणमसाठी, तर त्याआधी ईद व मोहरम सणासाठी कोरोना नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लक्षात आले आहे. पुढील दोन महिन्यात सणासुदीचा काळ असून या पार्श्‍वभूमीवर पुढील दोन महिने महत्वाचे असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढली आहे, ही बाबही चिंता वाढविणारी ठरत आहे. मुंबईत एकाच सोसायटीत डेल्टा प्लसचे पाच रुग्ण आढळले आहेत. याआधी बुधवारीच जिनोम चाचणीत एका दिवसात डेल्टा प्लसचे 27 रुग्ण राज्यात आढळल्याचे समोर आले होते. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत. मुंबईतही रुग्ण संख्या हळूहळू वाढू लागली असून कांदिवलीतील एका सोसायटीतच 17 कोरोना रुग्ण आढळल्यानंतर येथे कंटेन्मेंट झोन बनविण्यात आला आहे. याशिवाय आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथालयात 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले. त्यानंतर महापालिकेने ही इमारत सील केली आहे. केंद्रीय गृहसचिवांनी या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र आणि केरळमधील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही, हे सुद्धा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लक्षात आणून दिले.

leave a reply