महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे ५३ बळी

एकूण रुग्णांची संख्या २२ हजारांवर

मुंबई – रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीने आणखी ५३ जण दगावले. तसेच एकूण रुग्णांची संख्या १२७८ ने वाढून २२ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत ८७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. संपूर्ण राज्यात आणि मुंबईत चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या साथीच्या रुग्णांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वात वाईट स्थिती असून राज्यातील या साथीच्या रुग्ण संख्येने २२ हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. रविवारी राज्यात एकाच दिवसात ५३ जणांचा बळी गेला. हा सुद्धा आतापर्यंतचा उच्चांक आहे. राज्यातील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या ८३२ झाली असून मुंबईतील या साथीने दगावलेल्यांची संख्या ५०८ झाली आहे.

रविवारी मुंबईत चोवीस तासात १९ जणांचा बळी गेला. मुंबई आणि पुण्यानंतर राज्यात सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव समोर आले असून मालेगावमध्ये १४ जण दगावले आहेत. पुणे आणि जळगावमध्ये पाच रुग्ण दगावल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

दरम्यान रविवारी राज्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात सात पोलीस या साथीने दगावले असून ७८६ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी ८८ पोलीस अधिकारी आहेत. त्याचवेळी राज्यात लॉकडाऊनच्या अंमलबाजवणीसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याचा २०० घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यामध्ये ७०० जणांना अटक झाली आहे.

leave a reply