उत्तर कोरियाच्या आण्विक हालचालींमध्ये वाढ

सेऊल – उत्तर कोरियाने योंगब्यॉन प्रकल्पात आण्विक हालचाली वाढविल्या आहेत. अमेरिकास्थित अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून ही बाब उघड झाली. यावरुन उत्तर कोरियाने अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक प्लुटोनियमवर प्रक्रिया सुरू केली असावी, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत. गेल्या आठवड्यात चार क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन उत्तर कोरियाने अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासमोरील अडचणी वाढविल्या होत्या.

कोरियन क्षेत्रातील हालचालींवर नजर ठेवून असलेल्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज्’ या अमेरिकी अभ्यासगटाने मंगळवारी सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. यामध्ये उत्तर कोरियाच्या योंगब्यॉन शहरातील रेडिओकेमिस्ट्री लॅब आणि थर्मल प्लांटचे फोटोग्राफ्स आहेत. सदर परिसरातील एका चिमणीतून वाफ बाहेर पडत असल्याचे या अभ्यासगटाने निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा कार्यरत असून इथे प्लुटोनियमवर प्रक्रिया सुरू असल्याचा दावा या अभ्यासगटाने केला आहे.

सदर प्रयोगशाळेत सुरू असलेली ही प्रक्रिया पाहता, उत्तर कोरिया पुन्हा अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याची शक्यता अमेरिकेतील विश्‍लेषकांनी वर्तविली आहे. असे असेल तर अमेरिकेकडून उत्तर कोरियावर निर्बंधांची कारवाई होऊ शकते. उत्तर कोरियाने आपल्या अणुप्रकल्पात मोठे बदल केल्याची बातमी गेल्या महिन्यात अमेरिकी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती. आपली अण्वस्त्रे लपविण्यासाठी उत्तर कोरियाने योंगदोक्तॉंग तळ बंद केल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीने म्हटले होते.

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने चार क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या होत्या. यामध्ये लघू पल्ल्याच्या तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे उत्तर कोरियातील किम जॉंग उन यांची राजवट अमेरिका आणि दक्षिण कोरियाला इशारा देत असल्याचे बोलले जात होते. अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील युद्धसरावाच्या विरोधात उत्तर कोरियाने सदर चाचणी घेतली होती. अमेरिका आणि दक्षिण कोरियातील लष्करी सहकार्य आपल्याविरोधात असल्याचा आरोप उत्तर कोरिया करीत आहे. तसेच दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन हे अमेरिकेने पोसलेले पोपट असल्याची टीका उत्तर कोरियन हुकूमशहांची बहिण किम यो जॉंग यांनी केली.

दरम्यान, उत्तर कोरियाच्या या चाचण्यांमुळे निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करण्यासाठी दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तर येत्या शुक्रवारी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची विशेष बैठकही पार पडणार आहे. या बैठकीतही कोरियन क्षेत्रातील शांती व स्थैर्यावर चर्चा होणार आहे.

leave a reply