अलास्काच्या क्षेत्रातील रशियन लढाऊ विमानांच्या घुसखोरीत वाढ

- अमेरिकन वायुसेनेच्या अधिकार्‍यांचा आरोप

अलास्का – अलास्काच्या क्षेत्रात रशियन हवाई दलाच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. गेल्या वर्षी ६० हून अधिक वेळा रशियन विमानांनी या क्षेत्रात उड्डाणे केली होती. रशियन हवाई दलाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी अलास्कामध्ये तैनात असेलल्या अमेरिकेच्या वायुसेनेवर ताण येत आहे. याद्वारे रशिया अमेरिकेची ‘टेस्ट’ घेत आहे. मात्र आत्तापर्यंत आम्ही इथली परिस्थिती उत्तमरित्या हाताळलेली आहे, असे अमेरिकन वायुसेनेचे लेफ्टनंट जनरल डेव्हिड क्रम यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या सीमेजवळील रशियाची लष्करी तैनाती, राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीवरून अमेरिका व रशियामध्ये पेटलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, उभय देशांचे संबंध शीतयुद्धाच्या काळातील वैरापर्यंत येऊन ठेपल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, अलास्काच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकन वायुसेनेच्या लेफ्टनंट जनरल डेव्हिड क्रम यांनी केलेली ही विधाने लक्ष वेधून घेणारी ठरतात. गेल्या वर्षी ६० हून अधिक वेळा रशियन विमानांनी अलास्काच्या हवाई क्षेत्राजवळून उड्डाण केले होते. रशियाची विमाने या क्षेत्रात शिरल्यानंतर तातडीने अमेरिकेची लढाऊ विमाने रशियन विमानांचा पाठलाग करण्यासाठी झेपावतात. मात्र त्याआधीच रशियन विमाने या क्षेत्रातून बाहेर पडलेली असतात.

अशा प्रकारच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. लेफ्टनंट जनरल क्रम यांनी या घटनांमध्ये झालेली वाढ, शीतयुद्धाच्या काळातील सोव्हिएत रशियाच्या हवाई घुसखोरी इतकी असल्याचे दावे केले आहेत. याद्वारे रशिया अमेरिकेची तयारी व निर्धार यांची चाचणी करीत असल्याची नोंद लेफ्टनंट जनरल क्रम यांनी केली आहे. मार्च महिन्यात अमेरिकेच्या एअरफोर्सच्या नॉर्दन कमांडचे जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांनी रशिया आर्टिक्टमधील आपला प्रभाव वाढविण्यासाठी या कारवाया करीत असल्याचा आरोप केला होता.

रशिया जागतिक स्तरावर आपला दबदबा वाढविण्याच्या तयारीत आहे आणि आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी रशिया उत्सुक आहे. यासाठीच रशिया अलास्काच्या क्षेत्रात या कारवाया करीत असल्याचा आरोप जनरल व्हॅनहर्क यांनी केला. दरम्यान, बायडेन यांचे प्रशासन सत्तेवर आल्यानंतर रशियाच्या कारवाया अधिकच तीव्र झाल्याची नोंद काही विश्‍लेषक करीत आहेत. युक्रेनच्या सीमेजवळील आपल्या भूभागात रशियाने प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती करून जागतिक तापमान वाढविले होते. मात्र काही काळाने रशियाने इथली तैनाती मागे घेतली. या तैनातीची आता आवश्यकता राहिलेली नाही, असा खुलासा रशियाने केला होता.

मात्र रशियाची ही तैनाती बायडेन प्रशासनाची ‘टेस्ट’ करण्यासाठीच होती, असे विश्‍लेषक सांगत आहेत. युक्रेनच्या सीमेजवळील सैन्यमाघारीनंतर रशियाने ब्लॅक सीमध्ये युद्धसरावाचे आयोजन केले आहे. हा देखील रशियाच्या आक्रमक डावपेचाचा भाग मानला जातो.

रशियाकडून अलास्काच्या क्षेत्रात हे आव्हान मिळत असताना, इथल्या अमेरिकन एअरफोर्सवर ताण येत आहे. या ठिकाणी अमेरिकेची ‘एफ-२२’ लढाऊ विमाने, ई-३ हवाई सुरक्षा यंत्रणा, केसी-१३५ ही हवेतच इंधन भरून देणारी विमाने तैनात आहेत. सध्या रशियाकडून मिळत असलेल्या आव्हानाला आम्ही व्यवस्थितपणे तोंड देत असलो, तरी आपल्यावर ताण आलेला आहे, याची अस्पष्टशी कबुली लेफ्टनंट जनरल डेव्हिड क्रम यांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळात या क्षेत्रात अमेरिका अधिक तैनाती करून अलास्काची सुरक्षा अधिक भक्कम करण्याचा निर्णय घेऊ शकेल. पण अमेरिकेककडून असे दावे केले जात असताना, रशियाने मात्र अमेरिकेला धारेवर धरले आहे. अमेरिकेचा युरो-आर्टिक्ट क्षेत्रात आपले लष्करी वर्चस्व वाढविण्यासाठी हालचाली करीत आहे व नाटोलाही यात खेचत असल्याचा आरोप रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

leave a reply