चीनच्या लष्करी हालचालींचा धोका बळावल्याने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर लष्कराच्या युद्धसज्जतेत वाढ

रूपा – ‘अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील भागात चीनने लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही आपली सज्जता वाढविली असून लष्कर कुठल्याही आकस्मिक आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जर चीन सीमेबाबत निश्‍चित करण्यात आलेल्या संकेतांचे पालन करणार नसेल, तर भारतीय लष्करही यावर फेरविचार केल्यावाचून राहणार नाही’, अशा खणखणीत शब्दात भारतीय लष्कराच्या ईर्स्टन कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांड यांनी चीनला इशारा दिला आहे.

चीनच्या लष्करी हालचालींचा धोका बळावल्याने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर लष्कराच्या युद्धसज्जतेत वाढउपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नुकताच अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. त्यांच्या या भेटीवर चीनने आक्षेप घेऊन अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचे दावे ठोकले होते. भारताने स्पष्ट शब्दात चीनचे हे दावा धुडकावले. याच दरम्यान, चीन अरुणाचल प्रदेशनजिकच्या सीमाभागात आपल्या लष्कराच्या हालचाली वाढवित असल्याच्या बातम्या येत आहेत. लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्यासमोर चीनच्या जवानांची अवस्था बिकट बनलेली असताना, इथल्या तणावाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी चीन अरुणाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमधील एलएसीवर चिथावणीखोर कारवाया करीत असल्याचे दिसते.

लडाखच्या एलएसीवरील आपले अपयश झाकण्यासाठी चीन करीत असलेल्या या चिथावणीखोर कारवायांची गंभीर दखल भारतीय लष्कराने घेतलेली आहे. एलएसीवरील दुर्गम पहाडी भागांमध्ये भारताने इस्रायलकडून खरेदी केलेल्या हेरॉन ड्रोनची अहोरात्र पाळत ठेवण्यात येत आहे. यामुळे चीनचे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात असून यामुळे चीनच्या अस्वस्थेत अधिकाधिक भर पडत चालली आहे. अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशनजिकच्या एलएसीवरील चीनच्या कारवायांवर भारतीय लष्कराची करडी नजर रोखलेली असल्याची जाणीव लेफ्टनंट जनरल पांडे यांनी करून दिली.

लष्करी तुकडी, तोफांचा मारा करणारे पथक, हवाई सुरक्षा, रणगाडे आणि रसद तसेच अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करणारी व्यवस्था, हे सारे काही पूर्णपणे तयार असून याद्वारे लष्कराची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविली जात आहे. लष्कराच्या या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रूप्स-आयबीजीज्’च्या तयारीमुळे जलदगतीने वाहतूक व तैनाती करणे शक्य होत आहे. तसेच भारताने एलएसीवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविले असून याचा फार मोठा लाभ लष्कराला मिळत असल्याची बाबही लेफ्टनंट जनरल पांडे यांनी लक्षात आणून दिली. तसेच या क्षेत्रात भारतीय लष्कराच्या टेहळणीची क्षमताही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, याकडे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, भारत व चीनमधील एलएसीबाबत उभय देशांमध्ये सीमा व्यवस्थापन करार संपन्न झालेला आहे. या कराराचे पालन चीनकडून केले जात नाही व चीनचे लष्कर याचे वारंवार उल्लंघन करीत असल्याचे समोर येत आहे. त्याचा दाखला देऊन लेफ्टनंट जनरल पांडे यांनी चीनच्या या कारवाया लक्षात घेता, भारत देखील या करारातील तरतुदींचे पालन करण्यावर फेरविचार करीत असल्याचा संदेश चीनला दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारतीय लष्कराच्या एका अधिकार्‍यांनी आपले सैन्य एलएसीवर अधिक आक्रमक बनू शकेल, असे चीनला बजावले होते. त्याचवेळी भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांसाठी तिबेटी भाषेचे वर्ग सुरू करून भारताने तिबेटबाबतची आपली भूमिका बदलण्याची तयारी केल्याचे दिसू लागले आहे.

दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार भारताने तिबेट हा चीनचा भाग असल्याचे मान्य केले होते. पण अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा व पर्यायाने आपला भाग असल्याचे दावे करणार्‍या चीनला ताळ्यावर आणण्यासाठी भारताने आपले धोरण बदलण्याची तयारी केली असून याचा फार मोठा फटका चीनला बसू शकतो.

leave a reply