भारतात महिनाभरात कोरोनाचे ६६ लाख रुग्ण आढळले

६६ लाखनवी दिल्ली/मुंबई  – देशात शुक्रवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तीन लाख ८६ हजार नवे रुग्ण आढळले. तसेच तीन हजार ४९८ जण दगावले. चोवीस तासातील कोरोनाच्या बळींची आणि नव्या रुग्णांची संख्या देशात कोरोनाची दुसरी लाट आता शिखराकडे जात असल्याकडे दर्शवत आहे. येत्या १५ ते २० दिवसात कोरोनाची लाट शिखर गाठेल. त्यानंतर रुग्णांची संख्या ओसरण्यास सुरुवात होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. सध्या देशातील कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची थोडक्यात ऍक्टिव्ह केसेसची संख्या ३२ लाखांवर पोहोचली आहे. ही लाट जेव्हा शिखर गाठेल त्यावेळी याच ऍक्टिव्ह केसेसची संख्या ३६ ते ३७ लाख असेल, असा अहवाल आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढणार आहे. देशात एप्रिल महिन्यातच ६६ लाख नवे रुग्ण आढळले आहेत.

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेली माहिती पाहता चोवीस तासातील नव्या रुग्णांच्या नोंदीचा आणि बळींचा नवा उच्चांक नोंदविणला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातच ८२८ जण कोरोनाने दगावले. तसेच ६३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ४ हजार नवे रुग्ण आढळले, तर ८९ रुग्ण दगावले. नागपूरमध्ये ४ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आणि ८८ जणांचा बळी गेला. पुण्यात चार हजार नवे रुग्ण सापडले, तर ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ६२ मृत्यू हे पुणे शहरात झाले आहेत. नाशिकमध्ये ३ हजार ७४९ नवे रुग्ण आढळले असून ४० जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी कर्नाटकात ४८ हजार २२६ रुग्ण आढळले, तर २१७ जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेशात ३४ हजार ६२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच ३३२ जण दगावले. केरळात ३७ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारीही उच्चस्तरीय बैठक घेतली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाची बेठकही पार पडली. यावेळी एकूण देशातील कोरोनास्थितीवर व उपायांवर चर्चा करण्यात आली. देशात कोरोनाच्या वाढत असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी पंतप्रधानांनी मंत्रीगटाला आवश्यक निर्देश दिले.

महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही लाट ऑगस्टमध्ये येऊ शकते असा अंदाज वर्तविला जातो. ही साथ थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. देेशात कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल, तर ५० टक्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण वेगाने पुर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

leave a reply